सिव्हिल हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे पगाराविना हाल

आंदोलनाचा घेतला पवित्रा : 2 महिने पगार न मिळाल्याने हाल 
सातारा – सातारा सिव्हिल हॉस्पिटलमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे 2 महिने पगार न मिळाल्याने हाल झाले आहेत. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला असल्याची माहिती राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा चव्हाण यांनी दिली.

वर्ग 2 व वर्ग 3 च्या एकुण 400 महिला व पुरुष कर्मचारी यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर काम बंद आंदोलन केले. सकाळी 9 वाजल्यापासुन जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच ठाण मांडून सर्व कर्मचारी बसले असल्याचे चित्र दिसत आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. अशीच भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. संपूर्ण दिवसभर हे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आम्हाला कोणीच वाली नाही. आमचा कुटुंब प्रमुखच जागेवर हजर नाही. त्यांच्या पश्‍चात कोणीच प्रशासकिय आधिकारी आमची दखल घ्यायला नाही.

वारंवार चकरा मारून आम्ही दाद नक्की मागायची कुठे असा प्रश्‍न पडला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. दर महिन्याला आमची पगारासाठी परवड होत आहे. आम्हा सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे पगाराविना होणारे हाल कोण थांबवणार. कित्येक महिने आम्हाला याच प्रश्‍नासाठी आंदोलने करावी लागत आहेत याचे वाईट वाटते. यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर हे सुट्टीवर आहेत. त्यांच्या नंतर आमच्या समस्यांची दखल घेणारे कोणीही प्रशासकिय अधिकारी जागेवर हजर नाहीत.

आमच्या पगारामध्ये वारंवार विलंब का केला जात आहे. आमच्या समस्यांची सोडवणुक जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी करावी व आम्हाला न्याय द्यावा अशी साद देखील सुरेखा चव्हाण यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने घातली आहे. आपल्या कुटुंबीयाचे होणारे हाल या रुग्णालयातील प्रशासनाला दिसत नाहीत का असा सवाल उपस्थित करून आमच्या कुटुंबीयांच्या होणाऱ्या परवडीबाबत जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाचा कारभार निदर्शनास आणण्यासाठी तसेच आमच्या मागण्या मांडण्यासाठी आम्ही सर्व 400 कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला.

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयू विभाग, ऑपरेशन थिएटर, महिला प्रसूती विभाग या व इतर अत्यावश्‍यक ठिकाणी आम्ही काम सुरूच ठेवले आहे. सर्वसामान्य रुग्णांना कोणत्याही प्रकारचे नुकसान व गैरसोय होऊ नये याबाबतही सतर्कता बाळगण्यात आली आहे. मात्र येत्या काळात आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही संपूर्ण विभागातील काम बंद करू असा इशाराही निर्ढावलेल्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)