काळाबाजार थांबविण्यासाठी “जीपीएस’ यंत्रणा
पुणे – खासगी टॅंकर चालकांकडून वाढवण्यात आलेल्या पाण्याच्या टॅंकरचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी आता पाण्यासंदर्भातील तक्रारी आणि जास्त टॅंकरचे दर आकारण्यात येत असल्यास याची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे.
प्रशासनाने पाण्याचे दर किती असावेत यासाठी दरपत्रक तयार केलेले आहे. सर्व महापालिकेच्या कार्यालयांमध्ये आणि टॅंकर भरण्यात येत असलेल्या ठिकाणी हे दरपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या दराची माहिती होईल. टोल फ्री क्रमांकावर यासंदर्भातील तक्रारी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रविण गेडाम यांनी दिली.
महापालिकेच्या हद्दीबाहेर बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास नागरिकांनी याची तक्रार करावी, असेही गेडाम यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर ज्या टॅंकर चालकाने जास्त दर आकारला आहे त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. महापालिकेकडून होत असलेल्या पाणीपुवठ्यासाठी हा नियम असेल. खासगी बोअर अथवा विहिरीतून होणाऱ्या खासगी टॅंकरला हा नियम लावता येणार नाही हे महापालिका प्रशासनाच्या कक्षे बाहेर असल्याचे गेडाम म्हणाले.
ज्या भागात पाण्याची टंचाई आहे. अशा भागांमध्ये महापालिकेतर्फे 15 टॅंकर मोफत पाणी दिले जाते. महापालिका दररोज 250 टॅंकर मोफत देत आहे. शहरामध्ये 450 ते 500 हे खासगी टॅंकर आहेत. महापालिका त्यांना पास देते. दहा हजार लिटरच्या टॅंकरसाठी पालिका 522 रुपये आकारते. या टॅंकर चालकांनी केवळ महापालिकेच्या हद्दीमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. महापालिकेने 2013 मध्ये टॅंकरच्या दराची पॉलिसी मान्य केली. त्यानुसार टॅंकर पॉईंटपासून पाणी देण्याच्या अंतरावर दर ठरवण्यात आले आहेत. यामध्ये शून्य ते 12 किमीपर्यंत 1300 रुपये, 12 ते 20 किमीपर्यंत 1500 रुपये आणि 20 किमीपेक्षा जास्त अंतर असल्यास 1700 रुपये दर निश्चित करण्यात आल्याचे गेडाम यांनी स्पष्ट केले.