बंद बससेवेमुळे सर्वसामान्यांचे कोलमडले बजेट : डॉ. चिपाडे

नगर  -शहराची बससेवा बंद पडल्याने नागरिकांच्या समस्यांत आणखी भर पडली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर आणि रिक्षाचालक मनमानी भाडे घेत असल्याने नगरकर वैतागले आहेत. याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी इंद्रायणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश चिपाडे यांनी केली आहे.
डॉ. चिपाडे म्हणाले, बंद पडलेले पथदिवे, खड्डेमय रस्ते, तुंबणाऱ्या गटारी, अस्वच्छता आणि त्यामुळे येणारे साथीचे रोग अशा समस्या नगरकरांना नित्याच्याच आहेत.

अशावेळी बससेवा बंद पडल्याने त्यात भर पडली आहे. आधी 10 रुपये द्यावे लागत असणाऱ्या प्रवासास सध्या 20-30 रुपये द्यावे लागत आहेत. इंधन दरवाढीमुळे भाडेवाढ होणार होती. मात्र, बससेवा बंद पडल्याने ही दरवाढ 200 टक्क्‌यांनी झाली आहे. त्यामुळे उपनगर भागासह एमआयडीसी भागात प्रवास करणारे कामगार आणि विद्यार्थी यांचे मासिक बजेट वाढल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

-Ads-

अशावेळी या महत्त्वाच्या समस्येवर मार्ग काढण्याऐवजी महापालिका प्रशासन कुराघोडीच्या डावात व्यस्त आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवादाचा दुवा असणाऱ्या नगरसेवक व पदाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन कर्तव्य पार पाडणे अपेक्षित होते. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन ही सेवा तातडीने सुरू होणे गरजेचे होते. मात्र, या दोन्ही चाकांना याचे भान राहिलेले नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

बससेवा आणि रिक्षाचालक यांची सेवा समांतर पद्धतीने सुरू असताना नागरिकांचा अंतर्गत प्रवासासाठी खर्च कमी होत होता. आता तोच वाढण्यासाठी प्रशासन व सत्ताधारी जबाबदार ठरत आहेत. सत्ताधारी युतीमधील बेबनाव आणि कुराघोडीच्या राजकारणात नागरकरांचा बळी जात आहे. त्यामुळेच आर्थिक पिळवणूक होण्यासाठी जबाबदार ठरणाऱ्या महापालिका प्रशासनाने यात वेळीच हस्तक्षेप करून नागरिकांसाठी बससेवा तात्काळ पुन्हा सुरू करावी, असेही डॉ. चिपाडे यांनी म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)