खंडणीखोर माथाडींची दमबाजी; घर बदलतानाही नागरिकांना दमदाटी

– संजय कडू

पुणे – माथाडींच्या नावे खंडणी मागणाऱ्या संघटना आता सर्वसामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहचल्या आहेत. एखाद्याने घर बदलल्यावर साहित्य शिफ्ट केल्यानंतर याची तत्काळ खबर या खंडणीखोरांना लागते. त्यांचे सदस्य तातडीने पावती पुस्तक घेऊन संबंधितांकडे घरमालकाकडे येतात. “तुम्ही माथाडी संघटनेच्या सदस्यामार्फतच घरातील सामान हलवले पाहिजे. तसे न केल्याने आता आमच्या संघटनेची पावती फाडा,’ असी दमदाटी केली जातेया प्रकारांना घाबरुन सर्वसामान्य नागरिक पैसे देतात. मात्र, “नागरिकांनी अशा खंडणीखोरांना घाबरू नये, त्यांची तक्रार केल्यास तातडीने दखल घेतली जाईल,’ असे पोलिसांनी म्हटले आहे.

हॉस्टिपल, हॉटेल आणि घर शिफ्टींगसाठी माथाडींचा संबंध येत नाही. मात्र, बोगस संघटना खंडणीच्या उद्देशाने असे प्रकार करत आहेत. सामान शिफ्ट केल्याची माहिती अनेकदा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून माथाडी संघटनेला दिली जाते. यावर हे “टगे’ संबंधित घर मालकाकडे धडकतात. शहरातील एका रुग्णालयाचे बांधकाम सुरू असताना त्या ठेकेदाराकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या माथाडी संघटना सदस्यांच्या मुसक्‍या खंडणीविरोधी पथकाने नुकत्याच आवळल्या आहेत. तर, राजकीय पक्षाशी संलग्न संघटना कामगार आयुक्तालयाकडे नोंद करतात. मागील काही वर्षांत संघटनेच्या नावापुढे “माथाडी’ असे नाव लावून अनेक संघटनांची नोंद झाली आहे. या संघटनांचा आणि माथाडी मंडळाचा कोणताही संबंध नाही.

मात्र, काही माथाडी कामगार या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांना माथाडी महामंडळाने दिलेल्या कार्डवर नोंदविलेल्या कामाव्यतिरिक्त दुसरीकडे काम करण्याचा कोणताही अधिकार नसतो. पण, कथित माथाडी संघटना शोरूम चालक, गोडाऊन चालक, बांधकाम व्यावसायिकांना धमकावत “आमच्या संघटनेलाच काम द्या’ असा दम भरतात. त्याबदल्यात मोठी रक्कम किंवा खंडणी मागतात. जर एखाद्या मालकाने त्याच्या कामगारांमार्फत मालाचा चढ-उतार केला, तरीही अशा काही संघटनांचे पदाधिकारी तेथे धडकतात. अनेकदा भीतीपोटी तक्रार केली जात नाही. यामुळे अशा संघटनांचे प्रस्थ वाढले आहे.

माजी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांचीच नोंदणी
सत्ताधारी पक्षातील एका माजी मंत्र्याने दोन नातेवाईकांना माथाडी महामंडळात बसवून त्यांच्या कार्यकर्त्यांची माथाडी कामगार म्हणून नोंद केली होती. यासंदर्भातल चर्चा विधिमंडळातही केली गेली. यामुळे माथाडी नावाच्या संघटनांच्या अध्यक्षांवर किती गुन्हे दाखल आहेत, हे जरी पोलिसांनी पाहिले तरी सत्य बाहेर येईल. यामुळे खरा माथाडी कामगार बदनाम होत असल्याची एका कार्यकर्त्याने व्यक्‍त केली.

सध्याचे माथाडी महामंडळ अस्तित्वात नसल्यासारखेच आहे. भोर, पुरंदर, वेल्हा, बारामती, पुणे शहर, इंदापूर, बाजार समित्या, मालधक्का, औद्यागिक क्षेत्र आदी मोठे कार्यक्षेत्र असताना माथाडी मंडळाकडे अध्यक्षांसह फक्त 13 ते 15 अधिकारी व कामगार आहेत. तसेच महामंडळाकडे हजारो कामगारांची नोंद आहे. माथाडींच्या नावाखाली अनेक संघटना अनधिकृतपणे काम करतात. यावर अंकुश ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यपळ नसल्याने हे महामंडळ कूचकामी ठरत आहे.
– राजेश मोहोळ, तोलणार संघटना.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here