कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

संजय भरगुडे

शिरवळ – शिरवळ, ता. खंडाळा, शिरवळ ग्रामपंचायतीकडून सटवाई कॉलनीलगत टाकण्यात येणाऱ्या कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याठिकाणी असणाऱ्या फुलमळा येथील बांधाऱ्याचेही अस्तित्व धोक्‍यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा खेळ होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

औद्योगिकदृष्ट्या प्रगत होत असलेल्या शिरवळ याठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत साधारणपणे घंटागाड्यांच्या माध्यमातून अंदाजे आठ ते दहा टन दररोज कचरा संकलन करण्यात येतो. संकलन केलेला कचरा हा शिरवळपासून अंदाजे दोन-तीन किलोमीटरवर असणाऱ्या मांड ओढ्यालगत असणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय व पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेमध्ये टाकण्यात येतो. ग्रामपंचायतीमार्फत सर्व नियम धाब्यावर बसवत चक्क ओला-सुका कचरा एकत्रित टाकला जात असल्याने व त्यावर कोणतीही प्रक्रिया न राबवता जाळण्यात येत असल्याने होणाऱ्या धुरामुळे येथील फुलमळा, सटवाई कॉलनी व शिरवळकरांचे आरोग्याचे तीन-तेरा वाजत नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आक्षेपानंतर जेसीबीच्या माध्यमातून कचरा डेपोमध्ये टाकलेला कचरा जमिनीखाली पुरत येथील जमिनीवर सपाटीकरण केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे सटवाई कॉलनीमधील नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. यावेळी अग्निशमन बंबाच्या व खाजगी टॅंकरच्या माध्यमातून शिरवळमधील युवकांनी आग आटोक्‍यात आणण्यात यश मिळविले होते. त्यामुळे कचरा डेपोचा प्रश्‍न नागरिकांनी ऐरणीवर आणला असतानाही लोकप्रतिनीधी व शिरवळ ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

शिरवळ ग्रामपंचायतीमार्फत ज्याठिकाणी कचरा डेपो उभारण्यात आला आहे. त्याठिकाणी तत्कालीन आमदार मदन भोसले यांच्या माध्यमातून पंधरा लाख खर्च करुन मांड ओढ्यावर बंधारा बांधण्यात आला होता. आता कचरा डेपोमुळे बंधाऱ्यात कचरा गेल्याने व ग्रामपंचायतीकडून सपाटीकरणाची मोहीम राबवण्यात आल्याने बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. याठिकाणी तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य प्रदीप माने यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्मशानभूमी म्हणजे कचऱ्याचे आगार बनले असून स्मशानभूमीचे अस्तित्वही धोक्‍यात आले आहे. या कचऱ्यामुळे विहिरी, मांड ओढ्यावरील पाणी व नीरा नदीवरील पाणी दुषीत होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य दावणीला बांधले गेले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी लक्ष घालावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.

शिरवळ येथील ग्रामपंचायतीकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कचरा जाळण्यात येत असल्याने धुराचा नागरिकांना त्रास होत आहे. पाण्यामध्ये वास येऊन नागरिकांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नसल्याने पाणी नेमके कुठे मुरत आहे हेच समजून येत नाही.

उमेश गिरमे, फुलमळा (शिरवळ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)