स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढवा

पुणे – नागरिकांमध्ये कचरा निर्मूलनाबाबत जागृती करून स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी होण्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन करा. तसेच शहरातील विविध संस्था, मंडळे यांनाही सहभागी करून घेऊन कार्यक्रम, कार्यशाळांचे आयोजन करा, असे आदेश आयुक्‍त सौरभ राव यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले.

महापालिका मुख्य भवनात आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली “स्वच्छ सर्वेक्षण-2020′ संदर्भात आढावा बैठक झाली. यास अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अगरवाल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्‍त ज्ञानेश्‍वर मोळक, सहआयुक्‍त सुरेश जगताप, विजय दहिभाते, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप, उपायुक्‍त नितीन उदास तसेच सर्व सहायक आयुक्‍त आणि स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेचे संचालक हर्षद बर्डे आणि अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत क्षेत्रीय कार्यालय निहाय स्वच्छ सर्वेक्षण-2020 अंतर्गत विविध कामकाजांचा आढावा आयुक्‍तांनी घेतला. स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि नियोजन यातील अडचणी जाणून घेतल्या. जेथे कचरा मोठ्याप्रमाणात निर्माण होतो अशा बाजारपेठा, विविध कार्यालये, भाजी मार्केट, मंडई, मोठ्या स्वरुपाच्या मंदिरे, प्रार्थनास्थळे, हॉटेल्स, मंगल कार्यालये, व्यापारी संकुले, मोठ्या आस्थापना, वसाहती, झोपडपट्टी परिसर अशा ठिकाणी कचरा निर्मुलनासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी कशाप्रकारे नियोजन केले आहे, याची माहिती घेतली.

आयुक्‍तांच्या अधिकाऱ्यांना सूचना
कचरा अधिक होणाऱ्या जागा, कंटेनर संख्या कमी करणे, परिसरातील अन्य घटकांप्रमाणेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील नागरिकांचा कचरा निर्मुलनाबाबत नियोजन करणे, परिसर सौंदर्यीकरणाअंतर्गत विविध उपक्रम राबविणे, परिसर स्वच्छतेबाबत अधिक प्रमाणात होणाऱ्या कचऱ्याच्या जागा याबाबत काम करण्यापूर्वीचे व नंतरचे छायाचित्रे घेणे, जलद संवादासाठी बल्क “एसएमएस’ सुविधा उपलब्ध करून देणे आदी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)