महामार्गावर वाहन चालकांची सर्कस

कामशेतमधील परिस्थिती : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खड्डेच खड्डे

दुरवस्था तरीही टोलवसुली सुरूच

एकीकडे महामार्गाची दुरवस्था झाली असताना दुसरीकडे टोल वसुली केली जात आहे. रस्त्यातील खड्ड्यांकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे कामशेत उड्डाणपुलाचे काम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. महामार्गावरील खोल व मोठमोठाले खड्डे व साईट पट्ट्या त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय काजळे, रसिक दाभाडे, प्रदीप नाईक, युवराज शिंदे, गिरीश गदिया, अविनाश जाधव आदींनी केली आहे.

वडगाव मावळ  – कामशेत (ता. मावळ) येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खोल व मोठमोठाले खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहने चालविताना सर्कस करावी लागत आहे. खड्डे चुकविताना सर्रासपणे किरकोळ व गंभीर अपघात होत आहे. याच ठिकाणी कामशेत व नाणे मावळातील वाहनांची तसेच विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ असते. पादचाऱ्यांना जीव मुठ्ठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.

कामशेत येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर उड्डाणपूलाचे काम रखडले असून 31 मे 2018 या कामाची मुदत संपली. निर्माण कन्स्ट्रक्‍शनला कामाचे कंत्राट दिले असून या मार्गावर 24 तास अवजड व इतर वाहतूक सुरु असते. कंत्राटदाराने पुलाचे काम वेळेत पूर्ण न करता केवळ काम सुरू असल्याचा दिखावा केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या पुलाच्या परिसरात सुरक्षित वाहतूक होण्यासाठी सूचना फलक उभारले नाहीत. रस्ता खोदलेल्या ठिकाणी सुरक्षेची खबरदारी घेतली गेली नाही. ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचा नाहक बळी जात आहे.

मावळ तालुक्‍यात निर्माण कन्स्ट्रक्‍शनवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. असे असतानाही ठेकेदार आणखी किती बळींची प्रतीक्षा करत आहे, असा सवाल नागरीक करीत आहेत.
महामार्गावर खोल व मोठमोठाले खड्डे पडले असून दिवसेंदिवस या खड्ड्यांची खोली व आकार वाढत असल्याने वाहने आदळून टायर पंचर होऊन वाहने महामार्गामध्येच बंद पडत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. महामार्गातील खोल व मोठमोठाले खड्डे चुकविण्याच्या नादात दैनंदिन अपघात होऊन किरकोळ व गंभीर अपघात होतात. प्रसंगी मृत्यू झाल्याची घटना घडत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने ते दूषित पाणी वाहनांच्या टायरमधून उडून पादचाऱ्यांच्या अंगावर पडत आहे. मावळात सुरु असलेल्या संततधारेने महामार्गाच्या साईट पट्ट्या खचल्याने वाहने पलटी होऊन अपघात होत आहेत. मावळ तालुक्‍याला राज्यमंत्री पद मिळाल्याने या पुलाचा प्रश्‍न राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे सोडवतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)