#सिनेजगत : खलनायकाचा बदलता चेहरा (भाग 2)

-सोनम परब
 
चित्रपटात नायकाइतकाच खलनायकही महत्त्वाचा. मग तो पुरुष असो वा स्त्री; परंतु नायकाच्या भूमिकेला उठाव देण्यासाठी खलनायकही तोडीस तोड असावा लागतो. अनेक हिंदी चित्रपट खलनायकांमुळे अधिक यशस्वी ठरले आहेत. खलनायकाचा लाउड आणि क्रूर असा पूर्वीचा चेहरा आता राहिलेला नसून, संयत व्यक्‍ती खलनायकाच्या भूमिकांमध्ये दाखविल्या जात आहेत. अशा प्रकारचा खलनायक साकारण्यासाठी ताकदीच्या अभिनेत्यांची गरज असते. त्यामुळेच चित्रपटांमध्ये करिअर करणाऱ्यांसाठी नायकाप्रमाणेच खलनायकाची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे.

खलनायक कमकुवत असल्यामुळे चित्रपट यशस्वी न झाल्याचीही उदाहरणे आहेत. सस्पेन्स चित्रपटांचे बादशहा अल्फ्रेड हिचकॉक यांच्या मते तर खलनायक जितका यशस्वी होतो, तितका चित्रपट यशस्वी होतो. म्हणजेच, एखादा चित्रपट यशस्वी होण्यासाठी त्यातील खलनायक प्रबळ असायला हवा. रेस-3 चित्रपटाचा खलनायक सलमान खान कमकुवत पडल्यामुळेच तो चित्रपट अयशस्वी ठरला. साहेब बिवी और गॅंगस्टर-3, मुल्क आणि विश्‍वरूपम-2 या चित्रपटांमधील खलनायकही नायकाच्या तुलनेत कमकुवत पडले. हा अनुभव गाठीशी घेऊनच निर्मात्यांनी त्यापुढील चित्रपटांमध्ये खलनायक कमकुवत पडू नये, याची काळजी घेतल्याचे दिसते. येणाऱ्या काही चित्रपटांमध्ये कसलेले अभिनेते खलनायकाची भूमिका करीत आहेत.

अक्षयकुमार हा बॉलिवूडमधील आघाडीचा नायक. त्याच्या केवळ नावावरच चित्रपट यशस्वी होतात. परंतु रजनीकांतच्या 2.0 या चित्रपटात अक्षय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा नायक रजनीकांत स्वतः आहे. रजनीकांतच्या लकबी, स्टाइल आणि व्यक्तिमत्त्व प्रचंड लोकप्रिय आहे. असा अभिनेता जर नायक साकारत असेल, तर नायक प्रबळ बनविण्याऐवजी खलनायक प्रबळ बनविण्याची गरज असते. त्यामुळेच डॉक्‍टर रिचर्ड ऊर्फ क्रो मॅन म्हणून अक्षयकुमारला आणण्यात आले आहे. चित्रपटात अक्षयकुमार आपल्या मूळ चेहऱ्यात फार कमी वेळ दिसणार आहे. परंतु त्याचे केवळ अस्तित्वच चित्रपटाच्या खलनायकाला बळकटी देणारे ठरणार आहे. हा चित्रपट संपूर्ण देशभरात खूप चर्चेत राहील, अशी चिन्हे आहेत.

सुपर-30 हा नावावरून ऍक्‍शनपट वाटत असला, तरी तसा तो नाही. तो एक सामाजिक आशय असलेला चित्रपट आहे. अग्निपथमध्ये (नवीन) संजय दत्तचा चमचा म्हणून समोर आलेला पंकज त्रिपाठी सुपर-30 मध्ये खलनायक बनून हृतिक रोशनच्या समोर आला आहे. विद्यार्थ्यांना विनामूल्य गणित शिकविणारे आनंदकुमार यांचा विरोधक म्हणून तो पडद्यावर दिसेल. या चित्रपटासाठी पंकज त्रिपाठीला प्रोस्थेटिक मेक-अप केला असल्याचीही चर्चा आहे. परंतु हे पात्र अत्यंत संयमीपणे रंगविणे ही प्राथमिक गरज आहे. न्यूटन या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या पंकज त्रिपाठीव्यतिरिक्त या भूमिकेला दुसरे कोण न्याय देऊ शकणार?

खलनायकाचा बदलता चेहरा (भाग 1)   खलनायकाचा बदलता चेहरा (भाग 3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)