#सिनेजगत : खलनायकाचा बदलता चेहरा (भाग 1)

-सोनम परब
 
चित्रपटात नायकाइतकाच खलनायकही महत्त्वाचा. मग तो पुरुष असो वा स्त्री; परंतु नायकाच्या भूमिकेला उठाव देण्यासाठी खलनायकही तोडीस तोड असावा लागतो. अनेक हिंदी चित्रपट खलनायकांमुळे अधिक यशस्वी ठरले आहेत. खलनायकाचा लाउड आणि क्रूर असा पूर्वीचा चेहरा आता राहिलेला नसून, संयत व्यक्‍ती खलनायकाच्या भूमिकांमध्ये दाखविल्या जात आहेत. अशा प्रकारचा खलनायक साकारण्यासाठी ताकदीच्या अभिनेत्यांची गरज असते. त्यामुळेच चित्रपटांमध्ये करिअर करणाऱ्यांसाठी नायकाप्रमाणेच खलनायकाची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे.

कथा-कादंबऱ्यांप्रमाणेच चित्रपटांतही नायक महत्त्वाचा, याबाबत दुमत नाही; परंतु नायकाच्या कारनाम्यांना महत्त्व येते ते खलनायकाच्या कारवायांमुळे. त्यामुळेच चित्रपटांच्या कथानकात खलनायक किती सक्षम, यालाही महत्त्व असते. हिरोला सुपरहिरो करतो तो खलनायकच. हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहिल्यास असे दिसून येते की, अनेक चित्रपटांमध्ये खलनायकच नायकापेक्षा सरस ठरला; अधिक लक्षात राहिला.

-Ads-

रणवीरसिंहसारख्या अभिनेत्यांनी हे ओळखले. त्यामुळेच रणवीरने संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटात रतनसिंह यांची भूमिका करण्याऐवजी अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका स्वीकारली. परिणाम सर्वांसमोर आहे. आज रणवीर 300 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या चित्रपटाचा गाजलेला खलनायक आहे. 300 कोटी क्‍लबचा अभिनेता असे बिरुद आज त्याला लाभले आहे. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या बागी-2 चित्रपटात स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा पुत्र प्रतीक आणि दर्शनकुमार हे दोन्ही अभिनेते खलनायकी भूमिकांमध्ये ठळकपणे उठून दिसले. त्यांच्यामुळेच टायगर श्रॉफ सुपरहिरो म्हणून समोर येतो.

हिंदी चित्रपटांत खलनायक म्हणून खास चेहरा असतोच असे नाही. सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटात कार्तिक आर्यन हा सनी निज्जरचा मित्र दाखवला आहे. परंतु त्याचे कारनामे या मैत्रीचेच शत्रुत्वात रूपांतर करतात. सनीचे नुसरत भरुचाशी लग्न त्याला मान्य नसते आणि ते मोडल्यावरच तो शांत होतो. असे शत्रूपेक्षा भयंकर मित्र फारच मोजक्‍या हिंदी चित्रपटांमध्ये दिसले. हिंदी चित्रपटसृष्टीतील कल्लूमामा अर्थात सौरभ शुक्‍ल यांच्या शत्रुत्वाचा रंगच काही और. त्यांच्यासारखा थंड डोक्‍याचा खलनायकही अभावानेच पाहायला मिळतो. सुधीर मिश्र यांच्या दास देव या राजकीय चित्रपटात तर असंख्य खलनायक आहेत. एवढेच नव्हे तर चित्रपटाच्या नायकाचीही प्रतिमा अखेरपर्यंत खलनायक अशीच राहते.

अलिया भट्टला शंभर कोटींची नायिका बनविणाऱ्या राजी चित्रपटात जर अब्दुल नसता, तर चित्रपट एवढा चर्चेत आला नसता. वास्तविक अब्दुल हा राजीच्या घरचा नोकर आहे. तो हेरगिरी करतो म्हणून सहमतकडून त्याला मारही खावा लागतो. अब्दुलचे हे पात्र अरिफ जकारियाने अत्यंत कमी संवाद असूनही जबरदस्त केले आहे. सलमान खानच्या सुपरफ्लॉप रेस-3 चित्रपटातही असंख्य खलनायक आहेत. अनिल कपूर, बॉबी देओल, फ्रेड्डी दारूवाला आदी सलमानचे शत्रू दाखविले आहेत. अर्थात, काहीशा बेगडी पद्धतीने अभिनय केल्यामुळे चित्रपटातील सर्वच पात्रे प्रभावहीन ठरली आहेत. संजय दत्तवरील बायोपिकमध्ये संजयची भूमिका करताना रणवीर कपूरने अक्षरशः कमाल दाखविली आहे, हे खरे; मात्र संजूला नशेची चटक लावणारा मित्र जुबिन मिस्त्री कुणी विसरूच शकत नाही. तोच संजूबद्दल सहानुभूती निर्माण करतो. जिम सर्ब या अभिनेत्याने हे पात्र उत्कृष्ट रंगविले आहे.

खलनायकाचा बदलता चेहरा (भाग 2)   खलनायकाचा बदलता चेहरा (भाग 3)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)