ख्रिश्‍चियन मिशेलने घेतले सोनिया गांधींचे नाव : “ईडी’कडून न्यायालयात माहिती

इटलीतील महिलेचे पुत्र “आर’ चाही उल्लेख

नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणातील दलाल ख्रिश्‍चियन मिशेल याने चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांचे नाव घेतले असल्याची माहिती सक्‍तवसुली संचलनालयाने शनिवारी दिल्लीच्या न्यायालयात दिली. मिशेल या चौकशीदरम्यान त्याला देण्यात आलेल्या कायदेशीर सहकार्याचा गैरवापर करत आहे. सोनिया गांधींबाबत विचारलेल्या प्रश्‍नांना कशी उत्तरे द्यायची याची विचारणा करणारी चिठ्ठी त्याने वकिलांना दिली असल्याचा आरोपही “ईडी’ने पतियाळा हाऊस न्यायालयात केला आहे.

“ईडी’वर सरकारकडून दबाव- कॉंग्रेस
दरम्यान एका विशिष्ट कुटुंबाचे नाव घेण्यासाठी मिशेलवर दबाव आणला जात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. चौकीदाराकडून सरकारी एजन्सीवर दाबाव आणला जात आहे. एकाच कुटुंबाला लक्ष्य करण्यासाठी भाजपचे स्क्रीप्टरायटर ओव्हरटाईम करत आहेत, असा आरोप कॉंग्रेसचे नेते आरपीएन सिंह यांनी केला आहे. तर सत्तेत असताना कॉंग्रेसने देशाची कशाप्रकारे लूट केली होती, हे “ईडी’च्या वक्‍तव्यातून समोर आले असल्याची टीका भाजपने केली आहे. मिशेलच्या चौकशीदरम्यान नवीन नावे आणि विशेषणे उजेडात येत आहेत, असे भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनीही म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिशेलने चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांचा उल्लेख केला. तसेच भारताचा भावी पंतप्रधान असणाऱ्या इटलीतील महिलेच्या मुलाचा’ उल्लेखही त्याने केला असल्याची माहिती “ईडी’ने न्यायालयात दिली. त्याने सोनिया गांधी यांचे नाव कोणत्या संदर्भाने घेतले हे आताच सांगता येऊ शकणार नाही, असेही “ईडी’ने म्हटले आहे. मिशेलने इतरांशी केलेल्या संवादामध्ये “आर’ नावाच्या कोणा मोठ्या व्यक्तीचा उल्लेख येत होता. हे शोधण्यासाठी मिशेलच्या कोठडीची मुदत वाढवून मिळण्याची मागणी “ईडी’ने न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने त्याच्या कोठडीची मुदत 7 दिवसांनी वाढवली आहे.

नंतर टाटा उद्योगाकडे सोपवण्यात आलेल्या हेलिकॉप्टर व्यवहारातून आगोदर हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेडला कसे वगळण्यात आले होते, याची माहितीही मिशेलने चौकशीदरम्यान दिली, असल्याचे “ईडी’ने स्पष्ट केले. विशेष न्यायालयात आज मिशेलला हजर केले असता या चौकशीबाबतची माहिती “ईडी’ने दिली. सोनिया गांधींबाबत प्रश्‍न विचारले तर त्याला कशी उत्तरे द्यायची याची विचारणा करणारी चिठ्ठी त्याने वकील अल्जो के. जोसेफ यांच्याकडे सरकवली होती, असेही “ईडी’चे म्हणणे आहे. त्यावर मिशेलने केवळ कायदेशीर उत्तराबाबतची शंका विचारल्याचे त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. चौकशीदरम्यान वकिलांनी मिशेलपासून दूर थांबण्याची सूचना न्यायालयाने केली. रोज सकाळी आणि संध्याकाळी 15 मिनिटे मिशेलचे वकिल त्याला भेटू शकतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

मिशेलला अलिकडेच दुबईवरून भारतात आणण्यात आले होते आणि “ईडी’ने त्याला 22 डिसेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर मनी लॉंडरींगच्या आरोपांत त्याला 7 दिवसांची कोठडी देण्यात आली होती. सुरुवातीला सीबीआयशी संबंधित प्रकरणी त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)