भारताविरूद्धच्या मालिकेनंतर ख्रिस गेलची निवृत्ती

मॅंचेस्टर – वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ख्रिस गेल याने भारताविरूद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत.

भारतीय संघ या दौऱ्यात तीन टी-20, एक दिवसीय तीन सामने तसेच दोन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी सामना किंग्स्टन येथे 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. किंग्स्टन हे गेलसाठी घरचे मैदान असून कारकीर्दीतील अखेरचा सामना या मैदानावर खेळून तेथेच निवृत्त होण्याचे त्याचे नियोजन आहे.

गेल याने सांगितले की, भारताविरूद्ध टी-20 सामन्यांमध्ये मी खेळणार नाही. कसोटी हा खेळाचा आत्मा असल्यामुळे त्यामध्ये मी निश्‍चित भाग घेणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मी जरी निवृत्त होणार असलो तरी या खेळापासून मी दूर राहणार नाही. स्थानिक सामन्यांबरोबरच परदेशातील लीगमध्ये खेळण्याचे मला टाळता येणार नाही.

वेस्ट इंडिजचे व्यबस्थापक फिलीप स्पूनर यांनी गेलच्या निबृत्तीबाबतचे वृत्तास दुजोरा देत सांगितले की, त्याने माझ्याशी याबाबत सविस्तर चर्चाही केली आहे. जमेकातील कसोटी सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. 39 वर्षीय खेळाडू गेल याने आमच्या देशाच्या क्रिकेट क्षेत्राची खूप सेवा केली आहे. तो योग्यवेळी निवृत्त होत आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह वॉ (2004) व दक्षिण आफ्रिकेच्या जॅक्वीस कॅलीस (2013) यांनी मायदेशात भारताविरूद्ध झालेल्या मालिकेनंतर निवृत्ती घेतली होती. गेलही त्यांचेच अनुकरण करणार आहे. गेल याने आतापर्यंत 103 कसोटींमध्ये 7 हजार 215 धावा केल्या आहेत. कसोटी कारकीर्दीत त्याने दोन वेळा त्रिशतके ठोकली आहेत. त्याने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात एक द्विशतक केले आहे. तसेच टी-20 मध्येही त्याने शतक नोंदविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)