#चिंतन : फायदेबाज वृत्ती

डाॅ. दिलीप गरूड

मानवी प्रवृत्ती अशी आहे की, त्याला प्रत्येक गोष्टीतून फायदा हवा असतो. तो फायदा दिसत नसेल, तर तो त्यातून अंग काढून घेतो. परमेश्‍वराने ही पृथ्वीही आपल्या फायद्यासाठीच निर्माण केली आहे, अशी त्याची धारणा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहारात तो फायदा बघत असतो. या फायदावादी वृत्तीमुळेच नफा, एजन्सी, मोबदला, टक्केवारी, दलाली हे शब्द व्यवहारात रूढ झाले आहेत. आपल्या कामाचा योग्य मोबदला घेतला पाहिजे. याबद्दल वाद नाही. पण प्रत्येक गोष्टीतून फायदा झालाच पाहिजे असा अट्टाहास नको. काही क्षेत्रे अशी असतात, की त्यात सेवा, त्याग, समर्पण या गोष्टी महत्त्वाच्या असतात. एखाद्याची आई आजारी पडली आणि त्याने तिची शुश्रूषा केली, तर त्या शुश्रुषेबद्दल मोबदला मागणार काय?

-Ads-

हे सारे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे नुकतीच घडलेली एक घटना. पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नावाची एक संस्था काम करते. मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, म्हणून काही शैक्षणिक उपक्रम राबवते. मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढावी, त्यांनी थोरामोठ्यांची चरित्रे वाचून त्यापासून एखादा तरी गुण घ्यावा, सभेमध्ये उभे राहून धाडसाने बोलावे, असे उपक्रम राबवते. त्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या महामानवांचे चरित्र लिहून घेते. त्या चरित्रावर परीक्षा घेतली जाते. उद्देश असा की ते चरित्र मुलाने बारकाईने वाचावे. त्याच चरित्रावर नंतर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घेतली जाते. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रमाणपत्रे दिली जातात.

एकदा ग्रामीण भागातल्या एका हायस्कूलमधून एक शिक्षक संस्थेच्या कार्यालयात आले. ते म्हणाले, “”तुम्ही राबवत असलेल्या उपक्रमात आमच्या शाळेला भाग घ्यायचाय. मी मुख्याध्यापकांचे पत्र घेऊन आलोय.”
संस्थेच्या सेवकाने ते पत्र स्वीकारले. नंतर संस्थेतर्फे मोफत पाच चरित्रकथांची पुस्तके दिली. सोबत परिपत्रक आणि प्रश्‍नपत्रिका दिली. संस्थेचे सेवक म्हणाले,
“”मुलांचे गट करून ही पुस्तके त्यांना वाचायला द्या. नंतर त्यांची परीक्षा घ्या. त्यानंतर आमच्या कार्यालयात उत्तरपत्रिका जमा करा. त्या तपासल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना आम्ही बक्षिसे देऊ. त्याचा निकाल आम्ही तुम्हाला पत्राने कळवू. काही अडचण असल्यास फोनवर संपर्क करा.”
परिपत्रक, प्रश्‍नपत्रिका आणि पुस्तके त्या शिक्षकाने ताब्यात घेतली. तरीही ते तेथेच घुटमळत राहिले. तेव्हा संस्थेचे सेवक म्हणाले, “”काही अडचण आहे का?”
त्यावर ते शिक्षक म्हणाले,
“”आम्ही हा तुमचा उपक्रम राबवणार, तर मला त्याचा काही मोबदला मिळणार का?”
“”मोबदला म्हणजे?” सेवकाने विचारले.
“”नाही, त्याचं काय आहे, आम्ही दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे सुपरव्हिजन करतो, तर त्याचा आम्हाला मोबदला मिळतो. बोर्डाचे मुलांचे पेपर तपासले तर त्याचा मोबदला मिळतो. जनगणनेचे, निवडणुकीचे काम केले, तर त्याचा मोबदला सरकार देते. तेव्हा तुमच्या या कामाचा काही मोबदला मिळणार का? त्याचं काय आहे, आमचे मुख्याध्यापक आम्हाला कामाला लावतात. ते स्वतः काहीही मदत करत नाहीत. आता हे सर्व मलाच निस्तरावं लागणार. तेव्हा मी विचारतोय की या कामाचा काही मोबदला आम्हा शिक्षकांना मिळणार का?”
तेव्हा कार्यालयातील सेवक म्हणाले,
“”तुम्हाला पगार मिळतो ना?”
“”हो.”
“”तुमची नोकरी सरकारी आहे ना?”
“”हो.”

मग थोडा वेळ विचार करून कार्यालयातील सेवक म्हणाले, “” या कामाचा मोबदला देण्याचा ठराव अजून आमच्या संस्थेने केला नाही. मी तुमचा हा मुद्दा संचालकांच्या कानावर घालतो. जर हा ठराव पास झाला आणि संस्थेची आर्थिक स्थिती चांगली असेल, तर तुम्हाला मोबदला नक्की मिळेल.”
नाराज होऊन ते शिक्षक कार्यालयाबाहेर पडले. तेव्हा कार्यालयातील एक सेवक दुसऱ्या सेवकाला छद्‌मी हसत म्हणाले,
“”आई-वडील त्यांच्या मुलाला घडवतात, वाढवतात, शिक्षण देतात, स्वावलंबी बनवतात. मात्र त्याचा मोबदला काही मागत नाहीत. मग सरकारी सेवेत असणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना घडवताना वेगळा मोबदला मागावा काय?”

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)