चिनी अंतराळ यानाने पाठवली चंद्राच्या दुसऱ्या भागाची छायाचित्रे

बीजिंग (चीन): चीनचे अंतराळ यान चॅंग ई-4 ने चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाची छायाचित्रे पाठवली आहेत. चीनच्या राष्ट्रीय अंतराळ व्यवस्थापनाने-सीएनएसएने शुक्रवारी हे जाहीर करत असताना चॅंग ई-4 मोहीम पूर्णपणे यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. क्वेकियाओ या उपग्रहाच्या माध्यमातून चॅंग ई-4 ने ही छायाचित्रे पाठवली आहेत. चॅंग ई-4 चे लॅंडर प्रोब यूटू-2 (जेड रॅबिट 2) ने ही छायाचित्रे घेतली आहेत. त्यावरील शास्त्रीय उपकरणे उत्तम प्रकारे कार्य करत असल्याची आणि छायाचित्रे आणि अन्य माहिती त्याने पाठवली असल्याचे सीएनएसएने म्हटले आहे.

चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाचा अभ्यास करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची आणि स्वत:भोवती फिरण्याची गती एकच असल्याने पृथ्वीवरून चंद्राची कायम एकच बाजू दिसते. न दिसणाऱ्या बाजूला दूरची बाजू वा काळी बाजू असे म्हटले जाते. चॅंग ई-4 ने पाठवलेली दुसऱ्या बाजूची अनेक छायाचित्रे चीनने जारी केली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या निश्‍चित केलेल्या ठिकाणी उतरलेल्या प्रोबने (लॅंडर आणि रोव्हरचा प्रोबमध्ये समावेश आहे.) चंद्राच्या दुसऱ्या बाजूच्या पाठवलेल्या फोटोमध्ये असंख्य क्रेटर्स दिसत आहेत. या क्रेटर्समुळे यूटू-2 चे चंद्राच्या पृष्ठभागावरील भ्रमण कठीण असल्याचे दिसून येते.

पाठवलेल्या छायाचित्रांमध्ये 360 अंश पॅनोरॅमाचे एक छायाचित्र आहे. 80 छायाचित्रे एकत्र जोडून ते तयार करण्यात आले असल्याचे चीनच्या राष्ट्रीय खगोलशास्त्रीय प्रयोग शाळेचे उप संचालक ली चुनलाई यांनी सांगितले आहे.
चॅंग ई-3 ने पाठवलेल्या चंद्राच्या समोरच्या पृष्ठभागावरील छायाचित्रांची चॅंग ई-4 ने पाठवलेल्या दुसऱ्या भागाशी तुलना करता दुसरा भाग कमी खडकाळ असल्याचे दिसत आहे, असे ली चुनलाई यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)