उड्डाणपुलाच्या तीव्र उतारावर चौक ः वाहनचालकांची उडते तारांबळ
पुलावरून एकेरी वाहतुकीची मागणी
चापेकर उड्डाणपुलावरून सध्या या चौकातून दुचाकी, चारचाकी, मध्यम, अवजड रिक्षा, मालवाहतूक करणारे वाहने, पीएमपीएमएल, खासगी बसेस आदींची वाहतूक दररोज मोठ्या प्रमाणात होत आहे. कै. दामू तात्या चिंचवडे चौकात सिग्नल व्यवस्था असली तरी, तिला कोणी वालीच नाही, असे चित्र दिसून येत आहे. तसेच उड्डाणपूल देखील अरूंद असून आहे. त्यानवरील दुहेरी वाहतूक अपघाताला निमंत्रण देत आहे. या उड्डाणपुलाला समांतर पूल उभारावा अथवा पुलावरील वाहतूक एकेरी करण्याची मागणी होत आहे.
चिंचवड – चिंचवडगावातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. क्रांतिवीर चापेकर बंधू उड्डाणपुलावरून थेरगावकडे जाताना तीव्र स्वरुपाचा उतार आहे. त्यामुळे कै. दामू तात्या चिंचवडे चौकात वाहन चालकांची तारांबळ उडत असून हा चौक अपघाती बनला आहे.
थेरगाव भागाकडून जाणाऱ्या तसेच चिंचवडगाव मोरया मंदिर परिसरातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या रस्त्यावरून येणारी वाहने थेरगाव परिसराकडे जाण्यासाठी या चौकातूनच जावे लागते. चिंचवडगावमधून थेरगावकडे जाणारी वाहने देखील या उड्डाणपुलाच्या खालील रस्त्याने चौकातून पुढे जातात. उड्डाणपूलाखालील रस्ते एकेरी आहेत. चिंचवडगाव, तानाजीनगर, केशवनगर, प्रेमलोकपार्क, इंदिरानगर, क्विन्स टाऊन, सूदर्शननगर आदी परिसरातील दुचाकी, चारचाकी वाहने ही एकेरी मार्गाने जातात. थेरगाव येथील पवनानदी वरील पुलाच्या पुढे हिंजवडी, थेरगाव, ताथवडे, औंध तसेच एक्सप्रेस हायवेने पुणे-बेंगलोर तसेच ठाणे-मुंबई भागाकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.
चाकण, भोसरी, शाहूनगर, ताथवडे, मोहननगर, आकुर्डी, काळभोरनगर, संभाजीनगर, रुपीनगर आदी परिससरातील दुचाकी व चारचाकीवरून चिंचवडगाव येथील क्रांतीवीर चापेकर बंधू उड्डाणपूलावरून सर्व येणारी वाहने ही कै. दामू तात्या चिंचवडे चौकात येवून मिळतात. चिंचवडगावातील महासाधू मोरया गोसावी मंदिरात पंचक्रोशीतून त्यामुळे हा चौक तसेच उड्डाणपुलावर कायम रहदारी असते. मात्र, या चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे कायम बंद असतात. कोणतेही सूचना फलक येथे पहायला मिळत नाहीत.
वाहतूक पोलीस अभावानेच दिसतात. वाहतुकीला शिस्त न राहिल्याने या चौकात वारंवार अपघात होत आहेत. मोठी दुर्घटना घडण्याच्या आत महापालिका व वाहतूक विभागाने या चौक तसेच उड्डाणपूलाची पाहणी करुन उपाययोजना करण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे.