छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण अन् भव्य शेतकरी मेळावा; मान्यवरांची उपस्थिती
सुरेश डुबल
कराड – जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरूवार दि. 13 रोजी रेठरे येथे संपन्न होत आहे. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह युतीचे राजकीय नेते व पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अवघे चार महिने उरले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. ना. अतुल भोसले यांचे मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांतदादांशी चांगले संबंध आहेत. याचाच वापर करून ते दक्षिणेत कमळ फुलवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विधानसभेचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. आघाडीचा बालेकिल्ला म्हणून पश्चिम महाराष्ट्र ओळखला जातो.
या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजप-सेना युती सरसावली आहे. लोकसभा निवडणुकीत देशात मिळालेल्या यशाने यांच्या अंगावर वीथभर मांस वाढले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य शेतकरी मेळाव्याकडे अवघ्या कराड दक्षिणचे लक्ष लागून राहिले आहे. युतीमय असलेल्या या कार्यक्रमासाठी कराड उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंतकाका पाटील व वर्धन ऍग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनाही आवातणं धाडले आहे. ना. अतुलबाबांचे हात बळकट करण्यासाठी या कार्यक्रमात निश्चितच प्रयत्न केले जाणार हे नक्की. यामुळे ना. अतुलबाबांचाही आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
या कार्यक्रमास अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ना. सदाभाऊ खोत, ना. शेखर चरेगावकर, ना. नितीन बानगुडे-पाटील, मदनदादा मोहिते, शिवाजीराव नाईक, आ. पृथ्वीराज देशमुख या राजकीय मंडळींची उपस्थिती असणार आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रेठरे बुद्रुक येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रम होणार आहे.
धैर्यशील कदमांनाही अवातणं
कॉंग्रेसचे एकेकाळचे कट्टर कार्यकर्ते व वर्धन ऍग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम हे मागील विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस नेत्यांवर नाराज झाले. कदमांनी कमळ हातात धरण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार चव्हाणांनी त्यांना रोखले होते. त्यामुळे मध्यंतरी भाजप प्रवेश होता होता राहिलेल्या कदम यांनाही या कार्यक्रमास निमंत्रित केले आहे.
आमदारांच्या बंधूंना निमंत्रण…
शेतकरी मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत कराड उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंतकाका पाटील यांचे नाव छापण्यात आले आहे. ना. अतुल भोसले व आ. बाळासाहेब पाटील यांचे राजकीय वैर जगजाहीर आहे. मात्र या कार्यक्रमाला जयंतकाकांना निमंत्रित केल्याने मतदारसंघात वेगवेगळे तर्कवितर्क लोकांकडून लावले जात आहेत.