गोव्याला हवा पुर्णवेळ मुख्यमंत्री : कॉंग्रेस

कॉंग्रेस करणार आंदोलन

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे गेले अनेक महिने आजारी असून त्यांना राज्याचा कारभार चालवणे अशक्‍य बनले आहे. तरीही भाजपने त्यांनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले आहे पण त्यामुळे प्रशासन ठप्प पडले आहे. त्यामुळे राज्याला त्वरीत पुर्ण वेळ मुख्यमंत्री देण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली असून त्यासाठी त्यांनी शुक्रवार पासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गोव्याला पुर्ण वेळ मुख्यमंत्री नसल्याने सारे गोवा राज्यच सध्या अतिदक्षता विभागात गेले आहे असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. गोव्याचे मुख्यमंत्री सध्या घरातूनच राज्यकारभार सांभाळत आहेत.

त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू आहेत. गेल्याच आठवड्यात शेकडो कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा काढून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. येत्या शुक्रवारपासून आम्ही या मागणीसाठी गावपातळीवर आंदोलन सुरू करणार आहोत अशी माहिती राज्यातील कॉंग्रेसचे एक नेते चोडणकर यांनी दिली. ते म्हणाले की सध्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीविना होत आहेत.

ही बाब आम्ही राज्यपालांच्याही कानी घालणार आहोत असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नावाने सध्या गोव्याचा कारभार कोण पहात आहे, त्यांच्या वतीने कोण सरकारी कागदपत्रांवर सह्या करीत आहे हे भाजपने जाहीर करावे अशी मागणीही चोडणकर यांनी केली. पर्रिकरांचा अलिकडेच जो एक फोटो प्रसिद्ध झाला आहे त्यावरून ते कोणतेही कामकाज करण्याच्या अवस्थेत नाहीत हे स्पष्ट दिसत असूनही त्यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यामागे भाजपचा नेमका अट्टहास कशासाठी आहे हेही स्पष्ट व्हायला हवे असेही त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)