फुले दाम्पत्यांच्या `भारतरत्न` पुरस्कारासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

सावित्रीबाईंच्या जन्मगावी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार 

सातारा : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनीच महाराष्ट्रात पुरोगामित्वाची मुहुर्तमेढ रोवली, त्यांच्यामुळेच राज्याला पुरोगामी म्हणून ओळख मिळाली. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरच वाटचाल करू असे सांगत सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नायगाव या त्यांच्या जन्मगावी महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी महाराष्ट्रात परिवर्तन आणले. महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवून स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. स्त्री शिक्षणात भरीव कामगिरी करून त्यांनी सनातनी समाजाला झणझणीत उत्तर दिले. आज या गोष्टी सोप्या वाटत असल्या तरी त्या काळी या गोष्टी खूप कठीण होत्या. हे कार्य करताना समाजाचा मोठा रोष त्यांना सहन करावा लागला.

महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी समाजातील वंचितांपर्यंत विकास आणि महिलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे काम यशस्वीपणे केले. त्यांनी महिलांसाठी आणि विधवांसाठी मोठा लढा उभा केला. समाजातील वंचित घटकांच्यामागे उभे राहण्याचे काम या दाम्पत्याने केले. जातीभेद मिटविण्यासाठी तसेच स्त्रीमुक्तीसाठी मोठा लढा त्यांनी उभा केला. महात्मा फुलेंच्या कामाची प्रेरणा घेऊनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचे काम केले.

महिलांच्या मुक्तीसाठी आयुष्य घालवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या नायगावला `ब` दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करून मुख्यमंत्री म्हणाले, नायगावमध्ये `सावित्रीसृष्टी` उभारणीसाठी मान्यता देऊ. तसेच पुणे शहरातील ज्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारणीचा प्रश्न कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. मात्र सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून स्मारक उभे करण्याचे काम सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील महिला व वंचितांसाठी फुले दाम्पत्याने भरीव काम केले आहे. फुले दाम्पत्याला `भारतरत्न` पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असून राज्य सरकार या विषयी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगत संत सावता माळी यांचे जन्मगाव असणाऱ्या अरणचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला असून तेही काम वेगाने मार्गी लावणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)