स्मरण: छत्रपती शिवरायांचे दक्षिणायन…

माधव विद्वांस

निश्‍चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।

आज साऱ्या देशाचे दैवत छ.शिवाजी महाराजांची जयंती. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आज फक्‍त छ.शिवाजी महाराजच आहेत. महाराज व त्यांचे शूर मावळे यांच्या पराक्रमाच्या कथा, पोवाडे भरपूर आहेत. तरीही आज महाराजांचे काही महत्त्वाच्या गोष्टींचे स्मरण करणे गरजेचे आहे.

महाराजांच्या दूरदृष्टीमुळे इंग्रज अरबी समुद्राकडून भारतात पाय रोवू शकले नाहीत. अखेर इंग्रजांनी बंगालच्या उपसागरातून भारतात प्रवेश केला. जहांगिराचे कारकिर्दीत मांडू येथे ब्रिटिशांना सुरतेस वखार काढण्याची परवानगी मिळाली होती.पण महाराजांनी ब्रिटिशांचा व पोर्तुगिजांचा धोका लक्षात घेऊन पश्‍चिम किनारपट्टी सुरक्षित करण्याचे धोरण आखले. इंग्रजांच्या मुंबई, राजापूर येथे वखारी होत्या. तसेच पोर्तुगिजांकडे ताब्यात वसई होती पण त्यांना सह्याद्री ओलांडता आला नाही. महाराजांनी इंग्रजांवर दहशत बसविली होती. अलिबागपासून वेंगुर्ल्यापर्यंत सागरी दुर्गरचना करून किनारपट्टी सुरक्षित ठेवली. पुढे संभाजी महाराज व राजाराम महाराजांनी महाराजांचे धोरण पुढे चालविले. राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांच्या साथीने अरबी समुद्राची किनारपट्टीवर घट्ट पकड बसविली. कान्होजी आंग्र्यांच्या नंतर मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. ब्रिटिश श्रीलंकेला वळसा मारून कोलकात्यास पोहोचले व गंगेच्या तीराकडेने दिल्लीला गेले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे काम चालू असताना तेथे एक ब्रिटिश खबऱ्या आला होता.त्याने आपल्या वरिष्ठांना कळविले होते की, काही तरी बांधकाम चालू आहे पण कशाचे आहे याचा थांगपत्ता लागत नाही. म्हणजे ब्रिटिशही मागोवा घेत होते, पण महाराजही कोणासच काही कळू देत नव्हते. यावरून महाराजांची सागरी रणनीती व धोके याबद्दलचे धोरण लक्षात येते.

औरंगजेब व मुघल यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिंजी येथील किल्ला ताब्यात घेण्याचे धोरणही असेच अचंबित करणारे आहे. राज्याभिषेकानंतर औरंगजेब कधीही दक्षिणेत येईल याची शिवरायांना खात्रीच होती. सुरक्षितेचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर त्यांनी ऑक्‍टोबर 1676 मध्ये दक्षिणेकडे कूच केले, गदगमार्गे हैदराबादला जात असताना तेथील भागातील लोकांनी त्यांचेवर झालेल्या अन्यायाची जाणीव करून दिली व महाराजांनी तेथील आदिलशाहच्या सरदारांना पराभूत करून त्या भागावर पकड घट्ट केली. निजामाचा दिवाण मादण्णा याच्यामार्फत निजामाला विश्‍वासात घेतले.

हैदराबादेत एक महिनाभर मुक्‍काम करून निजामाचा पाहुणचारही घेतला. पुढील मोहिमेसाठी अत्यंत धूर्तपणे एक मोठा शत्रू शांत ठेवला. शहाजीराजांच्या बंगलोर व तंजावरमधील अस्तित्वामुळे मराठ्यांचे येणे-जाणे होते त्यामुळे तिकडे जाताना फारसा त्रास झाला नाही. गदग मोहिमेनंतर महाराज हैदराबादकडे गेले. त्यांचे मावळे चित्रकूट-बंगलोरमार्गे जिंजीकडे गेले.
दक्षिणेकडील हा राजधानीचा किल्ला राजागिरी, कृष्णगिरी व चंदरायदुर्ग अशा तीन टेकड्यांवर मिळून हा बांधलेला आहे. हा किल्ला कोणी बांधला यावर इतिहासकारात मतभेद आहेतच. पण तत्कालीन चोल व होयसळ राजांच्या कारकिर्दीत हे बांधकाम वर्ष 900 ते 1100 दरम्यान झाले असावे. विजयनगरच्या राजवटीत हा किल्ला भक्‍कम करण्यात आला. या किल्ल्याला खंदकही आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे 11 चौरस किलोमीटर आहे. यांतील राजगिरी सर्वांत उंच असा बालेकिल्ला आहे. त्याच्या तीन बाजूंनी उंच, तुटलेले कडे आणि उत्तरेकडून एक छोटीशी वाट आहे. किल्ल्याभोवती 13 किलोमीटर लांबीचा तिहेरी तट असून वर जाण्याची वाट मजबूत व अरूंद आहे. किल्ल्यात अनेक प्राचीन प्रेक्षणीय अवशेष असून त्यात दोन मंदिरे, कल्याण महाल, कोठारे, तोफा, कैद्यांची विहीर अशी उल्लेखनीय ठिकाणे आहेत.

इंग्रज या किल्ल्याला “ट्रॉय ऑफ द इस्ट’ असे म्हणत. त्यावेळी या भागात येऊन गेलेला व्हेनिस येथील पर्यटक निकोल मनुची याने शिवाजी महाराज यांची कार्यशैलीचे वर्णन केलं आहे. एबे बार्थेलेमी कारे नावाच्या फ्रेंच प्रवाशाला शिवाजी महाराजांच्या योजनेची कल्पना आली होती. महाराजांना सिंधू नदीपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंतचा मुलूख स्वतंत्र करावयाचा होता. या दृष्टीने त्यांची वाटचाल होती. त्याच्या नोंदीत त्याने तसे नमूद केले आहे.एका जेसुइट धर्मगुरूच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराज सुमारे 10,000 सैनिकांसह अचानक जिंजी समोर येऊन उभे ठाकले. एवढ्या मोहिमेचा ताकास-तूर न लागता शिवाजी महाराजांच्या बरोबर श्रीशैल्यमार्गे आलेले मावळे व चित्रकूट-हुबळीमार्गे आलेले मावळे एकाच दिवशी अचानक जिंजीच्या पायथ्याशी पाहून, आलेल्या आक्रमणाने आदिलशहाचा किल्लेदार नासिर मोहमद गडबडून गेला. महाराजांना किल्ला सहज ताब्यात आला तर हवाच होता. रघुनाथपंतांना महाराजांनी नासिरकडे पाठविले. किल्ला ताब्यात घेतला पण महाराजांनी नासिरलाही आपल्याकडे वळवून घेतले. किल्ला ताब्यात घेताना रक्‍त न सांडता राजकीय मुत्सद्देगिरीचा वापर केला.

श्रीशैल्य यात्रेचे निमित्त करून निजामाचा पाहुणचार घेत ते दक्षिणेत सरकत होते. तर गदग-चित्रकूटमार्गे व हुबळी-बंगलोरमार्गे मावळे छोट्या-छोट्या गटाने दक्षिणेत जात होते. महाराजांनी कर्नाटकात अनेक किल्ले बांधले. तसेच जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली. गदग परिसरात नरगुंद, गजेंद्रगड येथेही किल्ले बांधले व यापाठीमागे जिंजीला संरक्षण देणे हाच उद्देश होता.ही मोहीम महाराजांनी राज्याभिषेक झाल्यावर 6 ऑक्‍टोबर 1676 रोजी सुरू केली व एप्रिल/मे 1677 च्या दरम्यान जिंजीवर ताबा मिळवला. त्यानंतर जिंजीच्या प्रदेशाची व्यवस्था लावून जून 1678 मध्ये तब्ब्ल पावणेदोन वर्षाच्या कालावधीनंतर महाराज रायगडावर परत आले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर छ. येसूबाई राणीसाहेबांनी छत्रपती राजाराम महाराजांना जिंजी येथे पाठविले. 11 किलोमीटर लांबीची तटबंदी असलेला हा किल्ला महाराजांनी अधिक बळकट केला होता.त्यामुळेच झुल्फिरखान वर्ष 1690 ते 1697 एवढी सात वर्षे जिंजीला वेढा घालून बसला. पण किल्लाही सर झाला नाही! छ. राजारामराजे या किल्ल्यावरून निसटले व सातारला आले. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती थक्‍क करणारी होती, हे यावरून समजून यावे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)