जाती-जातींमध्ये झुंजवणाऱ्यांच्या विरोधात लढूया : छगन भुजबळ

राष्ट्रवादीची “निर्धार परिवर्तनाचा’ यात्रा सुरु

रायगड: ओबीसी-मराठा या जातीमध्ये आरक्षणाच्या नावावर लढवले जात आहे. दोन्ही समाजाला सांभाळून रहावे लागणार आहे. तुमची-आमची लढाई ही दाणे टाकून झुंजवणाऱ्यांच्या विरोधात आहे. ही लढाई एकत्रित लढवली पाहिजे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने “परिवर्तन यात्रा’ सुरु केली. रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर पाचाड येथे जाहीर सभा घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील, अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे याची प्रमुख उपस्थिती होती.

भुजबळ यांनी आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांची नक्कल करत, तर कधी त्यांच्या घोषणांवर टिप्पणी करत आणि खोट्या आश्वासनांचा समाचार घेत जोरदार हल्ला केला. राफेल, चाय, पकोडे, मिडियावरील बंदी, युतीतील वाद या सगळ्या विषयांना हात घालत छगन भुजबळ यांनी सरकारवर तोफ डागली. या रायगडावरुन विजयाची ज्योत पेटवण्यासाठी माघार घ्यायची नाही, शेवटचं मत मतपेटीत पडेपर्यंत बाजुला हटायचे नाही, असा निर्धार करण्याचे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले.

अजित पवार म्हणाले, ज्या शिवछत्रपतींचा आर्शिवाद आणि त्यांच्या नावाचे ब्रॅडींग करुन भाजपाने सत्ता मिळवली. लोकांना “अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत देशातील आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी बळीराजाचे राज्य आणायचे आहे. जातीयविरोधी, कामगारविरोधी, सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर केले पाहिजे. यासाठी समविचारी पक्षांना एकत्र घेवून परिवर्तनाची मुहुर्तमेढ आज रोवली गेली आहे, असे ते म्हणाले. आता लाट वगैरे काही राहिलेली नाही तर यांची वाट लागलेली आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

भाजपला खड्यासारखं बाजूला काढा – धनंजय मुंडे
परिवर्तन हा निसर्ग नियम असून जे आपलं सरकार नाही त्या सरकारला खड्यासारखं बाजूला काढा, असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. पहिली लढाई युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलुमाविरोधी केली आणि आमचा निर्धार हुकुमशहाच्या विरोधात असल्याची स्पष्टता करतानाच छत्रपतींच्या नावाने सत्तेत आलेल्या आणि त्यांच्या नावाची बदनामी करणाऱ्या भाजप सरकारवर हल्लाबोल मुंडे यांनी केला. शिवाय शिवसेनेने वाघ हे चिन्ह बदलून आत्ता शेळीचे चित्र लावावे, असा टोलाही त्यांनी लगाविला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)