पुणे – तामिळनाडूच्या एम. आर. व्यंकटेश याने आठ फेऱ्यांमध्ये साडेसात गुणांची कमाई करत जयंत गोखले बुद्धिबळ अकादमी व आर्यन एंटरप्राईजने आयोजित भारतबाई हलकुडे स्मृती चषक अखिल भारतीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले आहे. ही स्पर्धा सिद्धी बॅंक्वेट्स हॉल येथे आयोजित करण्यात आली होती.
व्यंकटेश हा भारत पेट्रोलियमचा खेळाडू असून या मोसमातील त्याचे हे पहिलेच विजेतेपद आहे. त्याला एक लाख एक हजार 101 रुपयांचे प्रथम पारितोषीक मिळाले. त्याने पुण्यात 2007 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मानांकन स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. महाराष्ट्र चेस लीगमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला होता.
संतायन दास (रेल्वे), ए.आर.हरीकृष्णन (तामिळनाडू), एम. विनयकुमार (आंध्र बॅंक), राहुल संगमा (रेल्वे) व निरंजन नवळगुंड (कर्नाटक) यांचे प्रत्येकी सात गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे दोन ते सहा क्रमांक देण्यात आले. गुसेन हिमल (चंडीगढ), सप्तर्षी रॉय चौधरी (रेल्वे), शशिकांत कुतवळ (महाराष्ट्र) व आर. आर. लक्ष्मण (रेल्वे) यांनी अनुक्रमे सात ते दहा क्रमांक पटकाविले.
या स्पर्धेत केतन पाटील, अर्चित खरे, मृण्मयी बागवे, वेदांत गोस्वामी, पुष्कर डेरे, सहजश्री चोलेटी, अरुण वैद्य, मनोज संघवी, गौरव झगडे, आर. सुब्रमणीयन, अनिरुद्ध चटर्जी, भाग्यश्री पाटील, ओम कदम, केरा डागरिया, यश भारडिया, अस्मिता रे, राम परब, श्रेया हिपरगी, झिद निओ, दिया सवल यांना विविध वयोगटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचे बक्षीस देण्यात आले.
या स्पर्धेत वीस राज्यांमधील साडेचारशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतील 111 खेळाडूंना रोख पारितोषिके तर 151 खेळाडूंना चषक देण्यात आले. स्पर्धेसाठी अठरा लाख रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली होती. पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडू शेखर साहू यांच्या हस्ते झाला. या वेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते जयंत गोखले, मुख्य पंच गोपाकुमार, राजेंद्र कोंडे, शोभराज खोंडे, प्रकाश कुंटे, संघटक नागनाथ हलकुडे आदी उपस्थित होते. ही स्पर्धा अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने घेण्यात आली.