डांबराच्या तुटवड्यावर महापालिकेने शोधला पर्याय
पुणे – पावसाळ्यापूर्वीच्या रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेस आवश्यक असलेल्या डांबराचा तुटवडा निर्माण झाल्याने महापालिकेने त्यावर पर्याय म्हणून केमिकल सिमेंट रस्त्यांच्या डागडुजीसाठी वापरले जाणार आहे. या सिमेंटमुळे सिमेंट रस्ते तसेच डांबरी रस्त्यावरील खड्डे दुरूस्त करता येत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांच्या डागडूजीसाठी अशाप्रकारचे सिमेंट वापरण्यात येते.
शहरातील रस्ते पावसाळ्यात खड्डेमुक्त असावेत, यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे रिसर्फेसिंग केले जाते. त्यात प्रामुख्याने पथ विभागाने निश्चित केलेल्या आठ झोनमधील रस्त्यांचे सर्वेक्षण करून कोणत्या रस्त्यावर कोठे खड्डे पडण्याची शक्यता आहे, तसेच कुठला रस्ता उखडू शकतो याचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर या रस्त्यांची दुरूस्ती 1 ते 31 मे या कालावधीत केली जाते. त्यासाठी महापालिकेचा डांबर आणि खडी मिश्रणाचा स्वतंत्र हॉटमिक्स प्लॅंट येरवडा येथे असून आवश्यकतेनुसार त्या ठिकाणाहून हे मटेरियल रस्ते दुरुस्तीसाठी पाठविले जाते. महापालिकेकडून या प्लॅंटसाठी हिदूस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमकडून डांबर खरेदी केली जाते.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही कंपन्यांकडे डांबराचा तुटवडा आहे. त्यामुळे पालिकेस मागणी असलेल्या गाड्यांच्या तुलनेत केवळ 30 ते 40 टक्केच डांबर उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रशासनाचा वेळ वाया जात आहे. ही बाब लक्षात घेऊन डांबराला पर्याय असलेले तंत्रज्ञान महापालिकेकडून उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी यंदा पालिकेने केमिकल सिमेंट वापरण्याचा निर्णय घेतला आहे.