कलंदर: “चारापान’ चर्चा

उत्तम पिंगळे

(स्थळ: कोकणातील आप्पा खोतांचा गोठा. रतन आणि दिवाण (दोन बैल) निवांत हिरवागार चारा आणि पेंढा खात आहेत.)
रतन: काय जाम पाय मोडून गेले आठ दिवस चिखल करायला.
दिवाण: (मान डोलावत) हो ना, पण आता काय लावणीची कामे सुरू झाली, आपल्याला आता आराम आहे.
रतन: अरे होय, मी काल ऐकले की आपल्या भाईबंदांनी त्या मुंबईत पवईच्या कॉलेजच्या आवारात शिरून एका इंजिनिअर होऊ घातलेल्या मुलावर हल्ला केला म्हणे.
दिवाण: होय, आप्पा व पंत बोलत होते.
रतन: त्या मुलास बरे वाटू दे बाबा. त्या पोराचा काय दोष? तो त्याच्या कॉलेज परिसरात होता आणि आपला महाराजा गेला तडक आणि उडविला की.
दिवाण: होय, पण त्यात त्याची चूक कशी म्हणावयाची?
रतन: त्यानेच उडवला मग चुकी कुणाची?
दिवाण: होय, पण त्या महानगरीत बैलाच्या मालकाने त्याला सोडलाच कसा?
रतन: कसा म्हणजे? हा माणूस नावाचा आपला मालक हुशार असतो अन्‌ लबाड बी. दिला असेल असा सोडून तेवढाच चार-पाच दिवस बाहेर राहील, तिकडेच काय ते खाईल.
दिवाण: असं असतं होय शहरात. पण आजकाल हे मनुष्य प्राणी जनावरांना खूप दोष देऊ लागले आहेत. आता मागे त्या पुण्यात कुठे कालव्याची भिंत कोसळली आणि पाणी त्या झोपडपट्टीत गेलं.
रतन: मग त्याचं काय?
दिवाण: मग दोन दिवसांनी बातमी आली की उंदराने म्हणे ती भिंत पोखरली. झालं उंदरांच्या नावाने आरडाओरड. एक नक्‍की की याला माणूसच जबाबदार आहे.
रतन: आता उंदराने भिंत पोखरली मग माणूस जबाबदार कसा काय ते?
दिवाण: अरे, असे इतके उंदीर झालेच कसे? कारण आजूबाजूच्यांनी खाण्याचे उष्टे व शिळे पदार्थ असेच टाकून दिले मग, काय उंदरांना आयतेच खाणे मिळाले. मग उंदीर वाढतील नाही तर काय? औषधांमध्येही काही दम नसतो म्हणे.
रतन: अलीकडेच धरण फुटले तेही म्हणे खेकड्याने पोखरलं, मग ते तरी खरं ना?
दिवाण: तसं असेलही, पण येवढे खेकडे काय अचानक आले होय. हळूहळू धरण पोखरलं तर गळती सुरू झाली होती. लोकांनी ती माहिती सरकारदरबारी दिलीही होती. पण येथे नेहमीच काम करायला कोणाला सवड नाही. आणि मग काय अपघात झाला. मग डबल मेहनत करायला धावाधाव करायची. असंच सरकारी काम असतं म्हणे.
रतन: मध्येच तो बर्ड फ्लू का स्वाइन फ्लूही आला होता… (त्याला थांबवत)
दिवाण: हे सर्व अस्वच्छतेचे रोग आहेत. सर्व कचरा तसाच टाकायचा मग रोगराई होणार नाही तर काय?
रतन: लोक स्वतःच घर व परिसर स्वच्छ करतात आणि घाण दुसरीकडे व सार्वजनिक ठिकाणी फेकताना आपण किती वेळा पाहिलं आहे, म्हणूनच रोगराई होते.
दिवाण: तेच म्हणतो मी की, माणूस हुशार आहे पण लबाड व आळशीही आहे. त्याने स्वत:स पहिले सुधारले पाहिजे, उगा आपल्यावर तिकीट फाडू नये.
(रतन होकारार्थी मान हलवत चारा खाण्यात मग्न होतो)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)