चार्ज-रिचार्ज आणि डिस्चार्ज-जीवनातील (भाग २)

पेट्रोलचे बिल पेट्रो कार्डने भरले. हा आणखी एक डिस्चार्ज. ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत एकामागून एक मेसेज ऍलर्ट आले. सारे डिस्चार्जचे. सोसायटी मेंटेनन्सचा, विमा हप्त्याचा, विजेच्या बिलाचा….सारे आपोआप वसूल केले गेले. ह्या बॅंकिंग सिस्टिमचा हा एक फायदा आहे. वेळ वाचतो. नाहीतर पूर्वी सारे हप्ते भरण्यासाठी वेळ वाया घालवत जायला लागायचे, तेथे लायनीत थांबायला लागायचे. आपले पैसे घेऊन आपल्यावरच उपकार केल्यासारखी वागणूक असायची. पैसे देऊनही मनस्ताप असायचा. तो या ऑन लाईन पद्धतीमुळे आता चुकला आहे.
ऑफिसला जाऊन कामाला सुरुवात करण्यापूर्वी आठवणीने सौ.च्या मोबाइलचा रिचार्ज केला. ती दररोज आपल्या पोटासाठी डब्याचा रिचार्ज करून देत असते, मग आपण महिन्यातून एकदा मोबाइल रिचार्ज करायला काय हरकत आहे? ते ही खुशीने. आणि त्याचबरोबर केबल रिचार्ज केला. करमणुकीचा, माहितीचा आणि घरातील वातावरण चांगले राहण्यासाठीचा रिचार्ज तो. दुसऱ्या दिवशी मुलाच्या शिक्षणाचा रिचार्ज फीच्या रूपाने भरायचा होता. पेपरवाल्याचे बिल दिले. पैसे घेताना तो म्हणाला, साहेब, दोन तारखेला न मागता पैसे देणारे तुम्ही एकटेच बरं का. नाही तर 10-12-15 तारखेपर्यंत कुरकुरत बिल देणारेच जास्त. कधी कधी तर या महिन्याचे त्या महिन्याला जाते, तरी काही बोलता येत नाही बघा. तो आपला रिचार्ज घेऊन खुशीने गेला.
माझ्या मनात विचार आला, आता या मोबाइलपासून रिचार्ज हा शब्द जास्त वापरात आलाय. त्याचे महत्त्व समजू लागले आहे. पण आपण पूर्वीपासून रिचार्जवरच जगत आलोय, जीवनाचा आनंदही रिचार्जवरच घेत आलोय. दूर असलेल्या आईवडिलांना आनंदाने जाऊन भेटून आले, की त्या रिचार्जमुळे आपल्याला बरे वाटते आणि त्यांना तर मोठाच आनंद होतो. आपल्या मुलाचे आपल्यावर प्रेम आहे, तो आपल्याला विसरत नाही, आवर्जून भेटायला येतो या आनंदाचा केवढा मोठा रिचार्ज आहे त्यांच्यासाठी. बहिणी, भाऊ आणि अन्य नातेवाईकांच्या भेटीगाठी हा रिचार्जचाच प्रकार.
आपण मंदिरात जातो, भक्‍तिभावाने परमेश्‍वराला वंदन करतो, शरण जातो त्याला…. यात केवढा मोठा आनंद असतो, तो असतो, आपल्या जीवनाच्या रिचार्जकर्ता. एकेका क्षणाचा – एकेका दिवसाचा तो आपल्यासाठी रिचार्ज करत असतो. पण हा रिचार्ज किती मुदतीचा आहे हे सांगता येत नाही. यालाच जीवन म्हणायचे. जर तो रिचार्ज करायाल विसरला तर?

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)