चार्ज-रिचार्ज आणि डिस्चार्ज-जीवनातील (भाग १)

डॉ. तुषार निकाळजे
सकाळी उठून तयारी करत होतो. आज उठायला जरा उशीरच झाला होता. त्यामुळे घाई चालली होती. मुलाला ट्युशनला सोडायचे होते, मला ऑफिसला जायचे होते. स्नान करून चहा घेत होतो, तेवढ्यात सौ म्हणाली, “” अहो, माझा टॉकटाईम संपलाय. जरा रिचार्ज करा जाता जाता.” मी “होय’ म्हटले. नाही म्हणून सांगणार कोणाला? टॉकटाईम मोबाइलचा संपला होता, सौ. चा नाही. तो तर लाईफटाईम रिचार्ज असतो. हा सर्वांचाच अनुभव असतो. असो.
आज एक तारीख. ती विसरताच येत नाही. 20-25 तारखेपासूनच एक तारखेचे वेध लागत असतात. एक तारीख म्हणजे खुशीचा दिवस. दिन है सुहाना आज पहली तारीख है, खुश है जमाना आज पहली तारीख है, पहली तारीख है -असे किशोरकुमारने एका गाण्यात म्हटले आहे, त्याची आठवण झाली. पूर्वी रेडिओ सिलोनला दर एक तारखेला हे गाणे हटकून लागायचे आणि आम्ही मोठ्या आवडीने ते ऐकायचो. आता रेडिओ सिलोन चालू आहे की नाही हे माहीतच नाही. किती वर्षे झाली ऐकून. टीव्ही आला आणि रेडिओ सिलोन मोडीत गेला. जाऊदे. पण एक तारीख म्हणजे पगाराचा दिवस, आपल्या रिचार्जचा-महिन्याच्या रिचार्जचा दिवस. एक तारखेला पगार झाला की सारे कुटुंब-सारे घरदारच एका महिन्यासाठी रिचार्ज होते. कसे म्हणता? बरोबर ना? अर्थात, हा नोकरदारांचा विषय आहे. महिनाभर खर्डेघाशी केल्यानंतर हा पगारारूपी रिचार्ज होतो. तो ही महिनाभर पुरतोच असे नाही. तरी पण रिचार्ज होणार म्हटल्यावर खुशी होतेच.
सारे आवरून मुलाला घेऊन बाहेर पडलो. त्याला ट्युशनला सोडले. घरी येऊन सौ. ला सांगितले की ट्युशन संपल्यावर त्याला घेऊन ये. मला ऑफिसला लवकर जायचे आहे. डबा घेऊन बाहेर पडलो. मनात हिशेब चालू होता. पगार हातात येतो कधी आणि जातो कधी काही कळतच नाही. येणाऱ्या पैशाला एक वाट, जाणाऱ्याला मात्र हजार वाटा.
जात असतानाच मोबाइलचा मेसेज ऍलर्ट वाजला. मोबाईल काढून पाहिले तर बॅंकेत पगार जमा झाल्याचा मेसेज होता. अपना सबसे बडा रिचार्ज! मनाला बरे वाट्‌ले. गाडी पेट्रोल पंपावर घेतली आणि गाडीत पेट्रोल भरले. म्हणजे गाडीचेही रिचार्ज केले म्हणायचे. पेट्रोल भरत असतानाच परत मेसेज ऍलर्ट वाजला. पाहिले तर होम लोनचा हप्ता कापून घेतल्याचा बॅंकेचा मेसेज होता. कधीही चुकत नाहीत हे घेणेकरी. अगदी टपून बसल्यासारखे असतात. इकडे जमा झाले, की तिकडे कात्री लावलीच. 15 हजारांचा हप्ता कट झाला होता. म्हणजे डिस्चार्जला सुरुवात झा ऽऽऽ ली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)