फोडाफोडीच्या राजकारणाने समीकरणाने बदलणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पारडे जड : सर्वच पक्षांना कंबर कसावी लागणार

वाई – वाई तालुक्‍यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, नगरपालिकेत बहुमत, पन्नास टक्के ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने तालुक्‍यावर सध्यातरी राष्ट्रवादीची पकड मजबूत आहे. परंतु, राष्ट्रवादीच्या अंतर्गत बंडाळी व एकमेकांची जीरवाजीरवी यामुळे काही ठिकाणी पक्षाला किंमत मोजावी लागली आहे. देशात जसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढे विरोधक हतबल होतात त्याचप्रमाणे वाई तालुक्‍यात आमदार मकरंद पाटील यांचा करिष्मा आजही कायम टिकून आहे. पक्षातील बंडोबांनी कितीही उचल खाण्याचा प्रयत्न केला तरीही शेवटच्या क्षणी बाजी पलटण्याची किमया फक्त आ. मकरंद पाटील यांच्यातच आहे.

उलट कॉंग्रेसमध्ये एकनिष्ठ कार्यकर्ते व काही टक्के मतदार आजही माजी आमदार मदन भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असल्याने विधानसभा निवडणुकीत हार पत्करावी लागली तरीही मतांचा टक्का कमी झालेला नाही, ही जमेची बाजू आहे. वाई तालुक्‍यातील काही ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसने झेंडा फडकविला आहे. तसेच किसनवीर सहकारी साखर कारखाना कॉंग्रेसच्या ताब्यात असल्याने मदन भोसले यांच्याकडे नियोजन बध्द नेता म्हणून पाहिले जात होते, परंतु कारखान्याचे आर्थिक गणित कोलमडल्याने तालुक्‍यातील सर्वसामान्य शेतकरी मदन भोसले यांच्यावर प्रचंड चिडून आहे. याचा फायदा राष्ट्रवादी पुरेपूर उचलणार यात शंकाच नाही.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होवून आपले नशीब, गतवेळेस मदन भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आजमविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कॉंग्रेसमधील काही जेष्ठामुंळे ऐनवेळी माघार घेतल्याने स्वप्न धुळीस मिळाली. मंत्रिपदासह किसनवीर कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी मोठे सहकार्य मिळाले असते असे काही राजकीय तज्ञांचे मत होते. त्यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला सुगीचे दिवस आले असते, परंतु तालुक्‍यातील कॉंग्रेस मात्र हद्दपार झाली असती. तालुक्‍यातील राजकीय गणित पूर्णपणे बदलली असती. आरपीआयची सध्या भाजप शिवसेनेशी युती असल्याने आरपीआय सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या आदेशावर जिल्ह्यातील आरपीआय भूमिका ठरविणार. सध्या वाई तालुक्‍यात भाजपने आपली पक्कड मजबूत करण्याकडे भर दिला असला तरीही अंतर्गत गट-तटाच्या राजकारणामुळे भाजपामध्ये प्रचंड दुही माजली आहे.

याचा फटका भाजपला बसत असला तरीही स्वतःच्या स्वार्थापुढे काही पदाधिकाऱ्यांना त्याचे काहीही पडलेली नाही. नरेंद्र मोदींच्या लोकप्रियेतेचा फायदा भाजपला वाई तालुक्‍यात काही प्रमाणात झाला. हतबल झालेल्या काही पक्षातील मातब्बर नेते भाजपात प्रवेश करून आले. परंतु या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी मिळत नाही अशी मनसेतून बाहेर पडलेले व भाजपात प्रवेश केलेले गजानन बाबर व विक्रम वाघ हे आपली खंत व्यक्त करताना दिसत आहेत. विक्रम वाघ यांनी स्वतंत्र संघटना स्थापन केली तर गजानन बाबर पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशाही वावड्या तालुक्‍यात उठण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात शिवसेना-भाजप-आरपीआय युती झाल्यास गजानन बाबर काय भूमिका घेणार हे येणारा काळच ठरवेल, तर पूर्वी पासून कॉंग्रेसच्या गोटात राहून भाजपची जवळीक साधण्यात यशस्वी झालेले वाई अर्बन बॅंकेचे विद्यमान चेअरमन- चंद्रकांत काळे हे आपले नशीब अजमावण्याच्या तयारीत असताना पुन्हा एकदा माजी आमदार मदन भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असल्याने काळेंच्या स्वप्नाचा चुराडा होताना दिसत आहे, कॉंग्रेसचे तालुक्‍यातील नेतृत्व भाजपात जात असल्याने हे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रुचणार नाही, आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कॉंग्रेस मधून युवा नेते विराज शिंदे यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

राज्यामध्ये कॉंग्रेस- राष्ट्रवादी मध्ये युती झाल्यास देशाचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ना. शरद पवार यांनी युतीचा फॉर्मुला हा ज्या पक्षाचे मतदार संघात प्राबल्य आहे त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट दिले जाणार असे जाहीर केल्याने वाई मतदार संघात आ.मकरंद पाटील यांनाच तिकीट मिळणार त्यामुळे भाजपातून मदन भोसले व कॉंग्रेसमधून विराज शिंदे यांना बंडखोरी करून नशीब आजमावे लागणार आहे. तिन्ही पक्षांनी कंबर कसून प्रचार केल्यास काटेकी टक्कर होवून शिवसेना, मनसे, आरपीआय हे पक्ष ज्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहतील त्याचा विजय निश्‍चित?

राज्यात काहीही झाले तरीही तालुक्‍यात सर्व पक्षांची अंतर्गत मोट बांधण्याची कसब आमदार मकरंद पाटील यांच्यात आहेच तसेच नुकतेच जिल्ह्याचे माजी खासदार दिवंगत लक्ष्मराव पाटील यांचे निधन झाल्याने भावनात्मकसुध्दा आमदारांना त्याचा लाभ निश्‍चितच होणार आहे, त्यामुळे सध्या तरी आ. मकरंद पाटील यांचे पारडे जड आहे. दरम्यान सातारा जिल्ह्याचे खासदार छ. उदयनराजे भोसले हे कोणत्या पक्षातून निवडणूक लढविणार यावर सातारा जिल्ह्यातील राजकारण अवलंबून आहे, ते भाजपात जाणार कि अपक्ष निवडणूक लढविणार हे आज तरी स्पष्ट न झाल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

खासदारकीची उमेदवारी ही राष्ट्रवादीकडून खासदार छ. उदयनराजे भोसले यांनाच मिळणार की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेब या मतदार संघातून निवडणूक लढविणार, तसा राष्ट्रवादीचा आग्रह असल्याने महाराजांना आपली दिशा नक्कीच बदलावी लागणार आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सहा आमदारांचा महाराजांना विरोध असल्याने ते काय भूमिका घेणार? तसेच महाराजांची सर्व सामान्य जनतेत लोकप्रिय प्रतिमा आहे, त्याच बरोबर राष्ट्रवादीतून कितीही विरोध झाला तरीही जिल्ह्यातील इतर पक्षांचा अंतर्गत पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाल्यास महाराजांचा विजय कोणीही रोखू शकत नाही. वाई तालुक्‍यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यात पक्षविरहित उदयनराजेंना मानणारे कार्यकर्त्यांचा वर्ग मोठा आहे.

महाराजांना तिकीट मिळूनही बंडाळी झाल्यास खासदारकीला काटे की टक्कर पहायला मिळणार आहे. त्यातच शिवसेना स्वतंत्रपणे खासदारकी लढविण्याच्या मूडमध्ये असल्याने महाराजांचा मार्ग थोडा खडतर बनला आहे. एकंदरीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून सातारा जिल्ह्यासह वाई तालुक्‍याचे लवकरच राजकीय गणित स्पष्ट होणार आहे, तरीही आज मितीला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती झाल्यास राष्ट्रवादी विरुध्द भाजपा-शिवसेना विरुध्द कॉंग्रेस अशी तिहेरी लढत पहावयास मिळणार आहे, परंतु आरपीआयची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)