स्वभावात बदल करणे अवघड 

पालकांनी, विशेषत: आईने जर तिच्या मुलीला सातत्याने हीन वागणूक दिली, नेहमीच रागावली, मारत राहिली, तर त्या मुलीवर त्या सगळ्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही का? हे टाळायचे असेल, आणि आपली मुलगी एक सुसंस्कारी अशी घडवायची असेल, तर त्याची सर्वाधिक जबाबदारी ही आईवरच असते, हे नेहमी ध्यानात ठेवणे गरजेचे असते. 

मानसी चांदोरीकर
दुसरीमध्ये शिकणाऱ्या नेहाला घेऊन तिच्या वर्गशिक्षिका भेटायला आल्या. त्या नेहावर खूप
चिडल्या होत्या. तिला आत घेऊन आल्यावरसुद्धा त्या तिला रागावल्या. तिला एका कोपऱ्यात उभं केलं आणि स्वतः खुर्चीवर बसून बोलायला लागल्या.
“ही माझ्या वर्गातली नेहा. अतिशय त्रास देणारी मुलगी!’ शिक्षिकांचं हे बोल ऐकल्यावर प्रथम त्यांना थांबवून नेहाला वर्गात जाण्यास सांगितले व नंतर पुन्हा त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. तिच्याच बाबतीतल्या गोष्टी तिच्यासमोर बोलणे अयोग्य असल्याने तिला वर्गात पाठवणेच योग्य होते. नेहा वर्गात गेल्यावर बाईंनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.

“मला माफ करा. मी तिच्यासमोर असं बोलायला नको होतं. माझी चूक आली माझ्या लक्षात. पण काय करू मी खूप वैतागले होते. तिला रागावून, समजावून, प्रेमाने, जवळ घेऊन सुद्धा समजावून झाले. पण काही कलें तरी ती अजिबात ऐकत नाही. वर्गात सगळ्यांनाच खूप त्रास देते. मुलांना उगीचच मारते, ढकलते, चिमटे काढते, त्यांच्या हातातल्या वस्तू हिसकावून घेते. वर्गात सतत आपली जागा सोडून इकडे तिकडे फिरत राहते आणि नुसती फिरत नाही तर फिरताना मुलांना त्रास देत राहते. वर्गातली काही काही मुलं तर खूप घाबरायला लागलीयेत तिला. इतर मुलांच्या पालकांकडून तिच्या वागण्याबाबत सारख्या तक्रारी यायला लागल्यात. तुमच्याकडे येण्याआधी मी तिला मुख्याध्यापिकांकडेही नेऊन आणलं. त्यांनीही तिला समजावलं. पण हिच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“तिच्या अशा वागण्याने मला वर्गात शिकवताही येत नाही. तिला कदाचित हा वर्ग आवडत नसेल म्हणून आम्ही तिला दुसऱ्या वर्गात बसवून पाहिलं. पण तिथेही नेहा तशीच वागते. काही आणि कितीही प्रयत्न केले तरी नेहाच्या वागण्यात काहीच फरक पडत नाही. आताही तिने कारण नसताना वर्गातल्या एका मुलाला जोरात ढकलून दिले. बिचाऱ्याचं डोकं बाकावर आपटलं. कळवळून रडतोय तो काय करू? कसं हिचं हे वागणं कमी करायचं तुम्हीच सांगा.’

बाईंचं हे बोलणं झाल्यावर त्यांच्याकडून इतर आवश्‍यक माहिती घेऊन हे सत्र थांबवले. या माहितीत एक गोष्ट लक्षात आली की वारंवार भेटायला बोलावूनही तिचे पालक अजून एकदाही शाळेत भेटायला आले नाहीत. त्यामुळे तिच्या कौटुंबिक पार्श्‍वभूमीबद्दल कोणालाच काही विशेष माहीत नव्हते. शिक्षिकांनी बोलून झाल्यावर पुढील काही दिवस तिच्या वर्तनाचे वर्गात जाऊन निरीक्षण केले.

नेहाबाबत बाईंनी जे जे सांगितलं तसंच ती वर्गात सतत वागत होती. त्यानंतर पुढील काही सत्रात तिला एकटीला बोलावून तिची समस्या जाणून घेण्याच्या किंवा शोधण्याच्या दृष्टीने तिच्याशी संवाद साधला. वेगवेगळ्या मानसशास्त्रीय चाचण्या घेऊन तिची समस्या जाणून घेण्यात आली. या साऱ्या संवादातून चाचण्यातून एक गोष्ट लक्षात आली की समस्येचे मूळ कारण घरातील परिस्थितीमुळे आहे.

पण नेमकी समस्या किंवा कारण समजण्यासाठी तिच्या पालकांना भेटणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे मुख्याध्यापिकांच्या मदतीने तिच्या पालकांना ताबडतोब बोलावून घेण्यात आलं. या पहिल्या सत्राला तिचे वडील भेटायला आले. त्यांच्याशी संवाद साधताना असे लक्षात आले की, नेहाच्या आईचा स्वभाव अतिशय तापट आहे. ती घरी नेहाला सारखी मारते. रागावते, तिने ऐकले नाही तर तिला शिक्षा करते. तिने चांगले वागले पाहिजे. आईचे ऐकलेच पाहिजे असा तिचा हट्ट असतो. तसे घडले नाही की ती नेहावर चिडते. वडिलांकडून ही माहिती मिळाल्यावर त्यांच्या मदतीने लगेचच आईला समुपदेशनासाठी बोलावले. सुरुवातीला ती येण्यास तयार नव्हती. पण नेहाच्या वडिलांच्या प्रयत्नानंतर ती भेटायला आली.

सुरुवातीला आपले वर्तन आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी मान्यच केले नाही. पण नेहाची समस्या, तिचं वर्गातील वर्तन त्यामागील कारणे, तिच्या या वागण्यामागील घरात मिळणाऱ्या वागणुकीचे कारण या साऱ्याबद्दल जेव्हा त्यांना मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सविस्तर मार्गदर्शन केले, तेव्हा मात्र आपल्या वर्तनाचा नेहावर होणारा परिणाम, त्याचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपल्या वर्तनातील हा दोष कमी करण्यासाठी नंतर त्या नियमितपणे समुपदेशनासाठी येत होत्या.
सांगितलेले सर्व उपाय त्या प्रयत्नपूर्वक करत होत्या. स्वभावातील हा बदल करणे सुरुवातीला त्यांना अर्थातच खूप अवघड गेले. पण सततच्या प्रयत्नानंतर, मानसशास्त्रीय उपचारांच्या वापरानंतर त्यांना रागावर नियंत्रण मिळवता आले. त्यांच्यातील या बदलामुळे नेहाच्या वर्तनात आपोअपच बदल झाला आणि तिचे वर्गातील अयोग्य वर्तनही हळूहळू कमी होत गेले.
(केसमधील नावे बदलली आहेत.)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)