आशय बदलल्याने पालकत्वापुढे प्रश्‍नचिन्ह…

जाणीव  :  डॉ. उल्हास लुकतुके

गेल्या तीन पिढ्यांमधील पालकत्त्वाचा विचार करताना आज पालकत्वाचा आशय बदलल्याचे स्पष्टपणाने जाणवते. इलेक्‍ट्रॉनिक यंत्रे आल्यानंतर वागण्याच्या पद्धती, अपेक्षा आणि एकंदरीतच “काय मिळवायचे आहे’ याच्या कल्पनाच खूप बदलल्या आहेत. आमचे नियंत्रण नसलेली माहिती मुलांनी वापरली तर काय होईल या काळजीने पालक ग्रासलेले आहेत. काळाची पावले उलटी फिरवता येणार नाहीत. त्यामुळे पालकांचे आणि बालकांचे विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांचे फार मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्याची गरज आहे. केवळ लैंगिक बाबतीतच नव्हे तर जीवनाचे काय करायचे यासाठी तारुण्यपूर्व वयात जबाबदार माहिती देणे गरजेचे आहे.

माझा व्यवसायच मानसिक मार्गदर्शन असल्यामुळे निरनिराळी माणसे त्यांच्या अडचणी घेऊन माझ्याकडे येत असतात. याखेरीज आम्ही चालवत असलेल्या प्राजित स्वमदत गटामध्ये सामान्य स्तरावरील माणसे येत असतात. त्यांच्या अडचणी मला तिथे जाणून घेता येतात. त्यामुळे बदलत चाललेल्या युगातील कौटुंबिक विशेषतः संगोपनाचे, जडणघडणीचे, पालकत्त्वाचे प्रश्‍न मी जवळून जाणून घेत आलो आहे. याशिवाय मी स्वतः कौटुंबिक माणूस आहे. माझ्या नातीला वाढवताना पालकांना काय प्रश्‍न येतात आणि मला आजोबा म्हणून काय प्रश्‍न येतात हेही मी प्रत्यक्ष अनुभवतो आहे. अशा तीनही पातळ्यांवरील निरीक्षणांमधून, अनुभवातून आजच्या काळात पालकत्वापुढे एक प्रश्‍नचिन्ह उभे आहे हे मान्य करावे लागेल.

मुळात पालकत्वाचा आशयच निश्‍चित अंशांनी बदलला आहे. आज मी 78 वर्षांचा आहे. सुदैवाने माझे पालक त्या काळातही आधुनिक विचारांचे होते. त्यांनी माझ्यावर कोणतीही, कसलीही सक्‍ती केलेली नाही. मी कधीही त्यांच्या हातून मार खाल्लेला नाही. पण माझे पालकआणि मी ही एक पिढी, मी आणि माझी मुले ही दुसरी पिढी आणि माझी मुले आणि माझी नातवंडे जी आत्ताची जगणारी तरुण पिढी अशा तीन पिढ्यांचा मी साक्षीदार आहे. या तीन पिढ्यांमधील फरक पाहता आज पालकत्वाचा आशय बदलल्याचे स्पष्टपणाने जाणवते. आधीच्या पिढीत पालकांनी मुलांना हात धरून चालवावे, रस्ता पालकांनीच ठरवावा आणि मुलाने फक्त चालायचे अशी स्थिती होती.

आज नेमके इथे किंवा इथपासून पालकांचे कौशल्य पणाला लागत आहे. याचे कारण बोट धरून नेताना “पालकांनी माझे हात धरले आहेत’ असे वाटता कामा नये. पालकांनी मुलांना चालवले तरी “पालक आम्हाला खेचताहेत’ असे मुलांना वाटता कामा नये. आशयामध्ये हा मुलभूत फरक आहे. माझ्या पिढीला या सर्व गोष्टी गैरहजर होत्या. जसे सांगितले आहे तसे करायचे, असा तो काळ होता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, दोन पिढ्या नव्हे तर एक पिढीपूर्वीही सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्‍वभूमी स्थिर होती. माझ्या आई-वडिलांनी जे पाढे पाठ केले, जे संस्कृत पाठ केले तेच मीही पाठ केले. पण मी आणि माझी मुले यामध्ये फरक जाणवतो. ती मुले वेगळ्या प्रकारे शिकली, वेगळ्या हेतूने शिकली. सद्यस्थितीत पालक आणि पाल्य याच्यामध्ये हेतूंचे फरक हा आशयातील मूळ फरक आहे.

याखेरीज बाह्यतः खूपच गोष्टी बदलल्या आहेत. विशेषतः साधने आणि पद्धती यामध्ये खूप मोठे बदल झाले आहेत. खास करून, इलेक्‍ट्रॉनिक यंत्रे आल्यानंतर वागण्याच्या पद्धती, अपेक्षा आणि कोण कुठपर्यंत पोहोचू शकेल हे सारे पूर्णतः बदलून गेले आहे. आज माझी नात इंटरनेटचा वापर लीलया करू शकते. त्यात तिला काही वेगळे अथवा अभिमानास्पद किंवा ग्रेट वाटत नाही. माझी मुले जेव्हा किशोरवयीन होती, त्यावेळी भारतात संगणकाचे आगमन झाले. मुलांनी संगणकाचे ज्ञान आत्मसात केले. त्यांना आपण खूप काही तरी मोठे शिक्षण घेतल्यासारखे वाटले. तोपर्यंत कॉम्प्युटर फक्त व्यवसायात होता. माझे वडील आणि माझा मुलगा दोघेही मेकॅनिकल इंजिनिअर.

पण वडिलांच्या इंजिनिअरिंग होतानाची शिक्षणाची एकूण पद्धती आणि माझा मुलगा इंजिनिअर होताना ज्याप्रकारे शिकला त्यामध्ये खूप फरक होता. कारण तोवर घरात कॉम्प्युटर हजर झाला होता. गंमत म्हणजे माझ्या मुलीने शिकवणीवर्गात जाऊन कॉम्प्युटरचे प्रशिक्षण घेतले; पण आज माझी नात तो संगणक सहजपणाने हाताळते. थोडक्‍यात, त्या पद्धतीद्वारे जे मिळायचे ते आताच्या पालकपिढीला “मिळवावे’ लागले होते; पण आताच्या बालकपिढीला ते बटण दाबले की मिळते. ऍट वन क्‍लिक !

पूर्वी आपल्याकडे सात समुद्र ओलांडून जायचे नाही अशी धारणा होती. त्यामुळे त्या काळात इंग्लंडमध्ये शिकून पदवी घेऊन येणे हे एखाद्या दिग्विजयाप्रमाणे होते. माझी मुले इंजिनिअर झाली तेव्हाही परदेशात शिक्षण घेऊन येण्याला फार महत्त्व होते. पण आज शिक्षण दाराशी येऊन उभे राहिले आहे. घरबसल्या संगणकाच्या माध्यमातून शिक्षण घेता येऊ लागले आहे. हा फरक खूप मोठा आहे. या सर्वांमधून “काय मिळवायचे’ या कल्पनाच खूप बदलल्या आहेत. मला यक्ष प्रश्‍न दिसतो तो इथे. माहिती, साधने आणि पद्धती यांची अतिसुलभ उपलब्धता यामुळे कुठली माहिती आणि कशासाठी हा प्रश्‍न पालकांसमोर उभा राहिला आहे. कुठली माहिती आपल्या पाल्यांना मिळावी यावर पालकांचा परिणामकारक ताबा आहे असे मला वाटत नाही.

यासंदर्भात मोबाइलचेच उदाहरण घेतले तर पालकांनी सक्‍ती केली म्हणून घरात मुले मोबाइलचा वापर बंद करतील; पण शाळेत गेल्यानंतर किंवा घरी पालकांच्या गैरहजेरीत मुले ती सर्व यंत्रे वापरू शकतात. त्यामुळे माहिती, त्याची साधने आणि त्याचे विषय यावर पालकांचा काहीही ताबा राहिलेला नाही. पालकांची खरी चिंता याबाबत आहे. आमचे नियंत्रण नसलेली माहिती मुलांनी वापरली तर काय होईल या काळजीने पालक ग्रासलेले आहेत.

आजच्या काळात टीन एज किंवा तारुण्यपूर्व किंवा पौगंडावस्थेतील मुलांना नवसाधनांच्या माध्यमातून सर्व माहिती मिळालेली असते; पण ती प्रौढरीत्या वागवायची कशी हे मात्र कळलेले नसते. म्हणूनच ते अविचाराने नाते उभे करतात. इंटरनेटवर मुलगा-मुलगी गप्पा मारतात आणि नेटवरच म्हणतात की आमचे प्रेम आहे आणि आपण आता लग्न करू. थोडक्‍यात, त्यांना प्रेम ही संकल्पना कळलेली नसते. आपण एकत्र राहूया या संकल्पनेतील “एकत्र राहूया म्हणजे काय आहे’ हे कळलेले नसते. पालकांच्या जीवाला याचीच धास्ती आहे. याबाबत मुलांना काही सांगायला गेल्यास “आम्हाला बोअर करू नका’ असे म्हणतात. यंत्रावर मिळणारी माहिती गतीने मिळत असल्यामुळे मुलांची ते “ऐकण्याची’ तयारीच राहिलेली नाही. थोडक्‍यात, झपाट्याने आणि अनिर्बंध मिळणाऱ्या माहितीमुळे पालकत्वाचा आशय पूर्णतः बदलला आहे.

बदलांचे टप्पे पार करून पुढे गेल्यानंतर आता काळाची पावले उलटी फिरवता येणार नाहीत. इंटरनेट वगैरे काढून टाका असे म्हणता येणार नाही. त्यामुळे पालकांचे आणि बालकांचे विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांचे फार मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्याची गरज आहे. केवळ लैंगिक बाबतीतच नव्हे तर जीवनाचे काय करायचे यासाठी तारुण्यपूर्व वयात जबाबदार माहिती देणे गरजेचे आहे. कारण दुर्दैवाने शिक्षणपद्धतीचा बाजार झाला आहे. या शिक्षणपद्धतीतून घडलेल्या मुलांची श्रमाची तयारी नाही. सर्व गोष्टी विकत घेता येतात ही भावना मुलांच्या मनात रुजत चालली आहे.

पूर्वीच्या काळात डोकावले तर आधीच्या पिढीला वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण मिळवण्यासाठी विशिष्ट गुण मिळवणे अपरिहार्य होते. त्यासाठी अन्य मार्ग नव्हता. आजचे चित्र पाहिले तर कमी गुण मिळाले तर मुले पालकांना अतिरिक्‍त फी-डोनेशन-कॅपिटेशन फी भरा असे सहजगत्या सांगतात. पालकही जीव ओतून पैसे देतात. हे सर्व डोळ्यासमोर घडते आहे. माझ्या दोन्ही मुलांनी मिळालेल्या गुणांनुसार ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल तिथेच जाण्याची तयारी दर्शवली. कॅपिटेशन फी देऊन प्रवेश मिळत असतानाही! ही समज मुलांमध्ये होती. आज ती राहिलेली नाही.

मध्यंतरी, माझ्याकडे एक वडील आणि मुलगा आले होते. वडील म्हणाले की, या मुलाच्या प्रवेशासाठी मला पैसे भरावे लागले आणि ते वाया गेले. यावर चटकन मुलगा म्हणाला, “अहो पैसे वाया गेले काय म्हणता? प्रवेश मिळाला ना?’ हा आहे बदललेल्या वृत्तीतील फरक. आत्ताच्या पालक पिढीने हे अनुभवलेले आहे. आत्ताची मुले ही प्रश्‍न विचारतच नाही आणि आजची पौगंडावस्थेतील पिढी तर हे सर्व असेच असते असा स्वीकार करणारी आहे. पालकांसमोर प्रश्‍न आहे तो हा!तरुणांच्या मनामध्ये मूल्ये रुजवायची कशी? आधीची पिढी ज्याला मूल्ये म्हणत होती त्याला आताची पिढी मूल्ये म्हणतच नाही, ही यातील एक मोठी अडचण आहे.

सुरुवातीला फक्त विवाह होता. तो कायमचा होता. पुढच्या पिढीत हा विवाह मोडू शकतो ही संकल्पना आली. आता विवाहाची गरजच काय हा प्रश्‍न आला आहे आणि नवीन पिढी विवाहाशिवायच आपण एकत्र राहूया, त्यात काय अडचण आहे असे म्हणणारी आहे. ही मूल्यांची जी उतरंड आहे त्याचे काय करायचे हा पालकांपुढील प्रश्‍न आहे. अशा वेळी प्रबोधन करताना जी मूल्ये आपण स्वीकारतो ती आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातील याचे ज्ञान तरुणपिढीला द्यावे लागेल. यंत्र आणि फास्ट ऍक्‍सेस टू इन्फॉर्मेशन हे आता टाळता येणार नाही, पण “व्हॉट इज दॅट आय एम हेडिंग फॉर’ हा प्रश्‍न तरुणांच्या मनात येईल, या दिशेने प्रबोधन झाले पाहिजे. मी नेमका कुठे चाललो आहे, मी कुठे पोहोचणार आहे, जी पद्धत मी स्वीकारली आहे ती मला कुठे नेऊन पोहोचवणार आहे हे प्रश्‍न मुलांच्या मनात निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.

तिथपर्यंत पोहोचताना मिळणारी शरीराची सुखे आणि शरीराचा आनंद यापलीकडे जाऊन मी जिथे पोहोचेन तिथे मी स्वतः स्थिर राहू शकेन की नाही हा प्रश्‍न मुलांना स्वतःहून विचारता यायला हवा. दुर्दैवाने आजच्या पिढीला स्थैर्य ही संकल्पनाच पटत नाही. यंत्रांचा वेग अफाट असल्यामुळे काळाच्या संदर्भात स्थैर्य ही कल्पना आताच्या मुलांना अनावश्‍यक आणि खरे म्हणाल तर मूर्खपणाची, वेडेपणाची वाटते. पालक जेव्हा स्थिरतेचा विचार कर, दीर्घकालीक विचार कर, असे म्हणतात तेव्हाही मुले म्हणतात बोअर नका करू नका! काळाचे हे बदललेले माप आहे.

आज पालक आणि पाल्य यांच्यामध्ये दरी आहे. त्यामुळे प्रबोधन करताना स्थिरता हा विचार करताना काळाची पावले कमी वेगाने चालतात हे तरुण पिढीला कळायलाच पाहिजे. त्यांना उद्दिष्टांपासून आपण बाजूला खेचू शकणार नाही; पण तुला जे हवेसे वाटते ते तिथे पोहोचल्यावर मिळेल का, हा प्रश्‍न तरुणांना विचारला पाहिजे. जे “प्रिय’ वाटते ते मिळाल्यास त्याचे “श्रेय’ मिळाले पाहिजे. श्रेयस आणि प्रेयस यात फरक आहे.

“प्रेयस’ मिळावे असे वाटते पण “श्रेयस’ मिळवायचे असेल तर काळाची पावले धीमी करुन अधिक टिकाऊ काही तरी मिळवायला पाहिजे हे मुलांना समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. प्रिय गोष्टीच्या मागे धावा, ते मिळवाही; पण ते मिळवताना वैध, सभ्य आणि मान्यताप्राप्त मार्गांनी मिळवा, ही शिकवणूक आजच्या पिढीला देणे गरजेचे आहे. ते प्रेयस आहे आणि त्यापलीकडे एक श्रेयस असते व ते मिळवण्यासाठी खूप श्रम करावे लागतात. त्याचे फळ ताबडतोब मिळत नाही. त्याची प्रतीक्षा करावी लागेल. म्हणजेच त्यासाठी तेवढा काळ धीमा चालेल आणि हे त्या तरुणाने स्वीकारले पाहिजे. माझे जगणे हे केवळ प्रेयसावर अवलंबून नसून श्रेयसही अधिक महत्त्वाचे आहे आणि त्या दिशेने जाण्यासाठी आपण सांभाळून, इंद्रिय सुखाचा स्वार्थत्याग करुन निश्‍चयपूर्वक वाटचाल केली पाहिजे, हे त्यांना मनोमन पटावे लागेल. हे पटवून देण्याचे शिवधनुष्य आजच्या पालकांना पेलायचे आहे. त्यासाठी शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)