नवी दिल्ली – भारताची बहुप्रतिक्षीत अवकाश योजना चांद्रयान 2च्या लॉंचिंगचा आता नवा मुहूर्त ठरला आहे. इस्त्रोने आज लॉंचिंगच्या तारखेची घोषणा केली. याआधी चांद्रयान 2 हे 15 जुलैला रात्री 2 वाजून 51 मिनिटांनी अवकाशात झेपावणार होते. पण, आता येत्या सोमवारी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी लॉंच केला जाणार आहे. म्हणजेच जीएसएलव्ही हे यान 22 जुलैला चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे.
लॉंचिंगच्या अवघ्या 51 मिनिटे आधी ते रद्द करण्यात आले होते. इस्त्रोने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “एका तांत्रिक बिघाडामुळे 15 जुलैला चांद्रयान 2चे लॉंचिंग स्थगित करण्यात आले हाते. आता या लॉंचिंगसाठी 22 जुलै 2019, दुपारी 2 वाजन 43 मिनिटे ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.
चांद्रयान 2 हा इस्त्रोचा बहुप्रतिक्षीत प्रकल्प आहे. इस्त्रो हे यान चंद्रावरील दक्षिण धुव्रावर उतरवणार आहे. कारण की, आतापर्यंत या भागात फारसे संशोधन झालेले नाही. 2008 मध्ये पाठविण्यात आलेल्या चांद्रयान 1च्या यशानंतर चांद्रयान 2 यानाची योजना तयार करण्यात आली होती.