बंगलुरू – भारताच्या दुसऱ्या चांद्रयान मोहीमत 13 पे-लोड असणार आहेत. पे- लोड म्हणजे अंतरीक्षात प्रक्षेपित करायचे उपग्रह किंवा अन्य प्रयोग करणारी साधने आहेत. येत्या जुलै महिन्यात भारताची ही चांद्रयान मोहीम प्रत्यक्षात कार्यरत होईल अशी माहिती भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने दिली आहे. भारताचे हे यान 3.8 टन वजनाचे असेल. यावेळी भारताचे यान प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठ भागावर उतरणार आहे. 6 ते 16 जुलै या कालावधीत ही मोहीम चालणार असून 6 सप्टेंबर रोजी भारताचे यान प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार आहे.
ऑर्बिटर, लॅंडर आणि रोव्हर असे तीन महत्वाचे मॉड्युल या मोहीमेत असणार आहेत. यातील ऑर्बिटर हे चंद्राच्या शंभर किमी अंतरावरील कक्षेत स्थीरावणार असून लॅंडर (याला विक्रम असे नाव देण्यात आले आहे) चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणार आहे. रोव्हर हे तेथे काही प्रयोग करणार आहे. ऑर्बिटर आणि लॅंडर यांचे एकमेकांशी कनेक्शन असेल. जीएसएलव्ही एमके 3 या यानाद्वारे ही मोहीम प्रत्यक्षात येणार आहे.
या यानातून ही तीनही मॉड्युल अंतरिक्षात प्रक्षेपित केली जातील. पहिल्यांदा इंटिग्रेटेड ऑर्बिटर मॉड्युल चंद्राजवळच्या अंतरीक्ष कक्षेत सोडले जाईल. त्यातून प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे लॅंडर चंद्राच्या पृष्ठ भागावर प्रक्षेपित केले जाईल. या लॅंडर मध्येच रोव्हरचे मॉड्युल असणार आहे आणि ते लॅंडरच्या बाहेर येऊन चंद्राच्या पृष्ठ भागावर प्रयोग करणार आहे.