चंद्रकांत पाटील यांना काही ना काही बोलायची सवय

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका
 पुणे  –“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काही ना काही बोलायची सवय असून, तो त्यांचा स्वभाव आहे. या स्वभावाला औषध नसते,’ अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

चंद्रकांत पाटील यांनी “राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधले अनेक नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक असून, तसेच वर्षा बंगल्यावर अंधारात ये-जा करतात,’ असे वक्‍तव्य केले होते. त्यावर पवार म्हणाले, “वर्षा बंगल्यावर सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे लोक स्पष्ट दिसू शकतात. लोकांच्या मनात लोकप्रतिनिधींविषयी गैरसमज निर्माण करून शंकेचे वातावरण तयार केले जात आहे. चंद्रकांत पाटील आता सिनिअर झाले आहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. आम्हीही वेगवेगळी पदे भूषवली आहेत. पण, चंद्रकांत पाटील यांना सवयच आहे. प्रत्येकवेळी ते काही ना काही बोलतात. त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्‍न निर्माण होतो की त्यात आपला लोकप्रतिनिधीही आहे का? पण तो त्यांचा स्वभाव आहे. तुम्हाला माहिती आहे की स्वभावाला औषध नाही,’ अशा शब्दांत टीकास्त्र सोडले.

सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चा काढायचा नसतो
पीक विमा कंपन्यांविरोधात राज्यभर मोर्चे काढणाऱ्या शिवसेनेवर अजित पवार यांनी टीका केली. “सध्या शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. ते सरकारमध्ये आहेत. राज्य आणि केंद्रात त्यांचे मंत्री आहेत. सरकार चालवणाऱ्यांनी मोर्चा न काढता संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून, सूचना देऊन कार्यवाही करायची असते. मोर्चा काढणे हे त्यांचं काम नाही. शिवसेना कुठेतरी कमी पडत आहे. त्यांना प्रशासनावर वचक ठेवता येत नाही. त्यामुळे आम्ही कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, हे भासविण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे,’ असेही पवार म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)