साद-पडसाद: चंद्राबाबूंच्या प्रयत्नांना यश येईल? 

अविनाश कोल्हे 

गेले दीडदोन वर्षे भारतात झालेल्या अनेक पोटनिवडणूकांत अनेक ठिकाणी भाजपाचा पराभव झाल्यामुळे विरोधी पक्ष विलक्षण खुश असणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र आज विरोधी पक्षांच्या तंबूत सर्व भाजपाविरोधकांना एकत्र आणू शकेल असा नेता नसल्यामुळे विरोधी पक्षांचे मनसुबे कितपत प्रत्यक्षात येतील असा प्रश्‍न उपस्थित होत असतो. आता या विषयात चंद्राबाबू नायडू यांनी लक्ष घालायचे ठरवले आहे, असे दिसते. 

राहुल गांधी जरी कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असले, तरी ते राष्ट्रीय राजकारणात तरुण आहेत व सरकारी कर्मचाऱ्यांच्या भाषेत “ज्युनिअर’ आहेत. मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, एन. चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, मायावती आदी नेत्यांच्या तुलनेत वयाने लहान आहेत. अशा स्थितीत जरी भाजपाचा पराभव करता आला तर देशाचे नेतृत्व कोणी करायचे, हा खरा प्रश्‍न आहे.

काही महिन्यांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या मदतीने “फेडरल फ्रंट’ स्थापन करण्याचे जोरदार प्रयत्न केले होते. यथावकाश या “फेडरल फ्रंट’मध्ये कॉंग्रेसला घ्यायचे की नाही, याबद्दल वाद होऊन जन्म होणाआधीच “फेडरल फ्रंट’ बारगळली. ममता बॅनर्जींच्या मते या “फ्रंट’ मध्ये कॉंग्रेसला प्रवेश असावा; तर चंद्रशेखर राव यांना “कॉंग्रेस’ या शब्दाचीच ऍलर्जी आहे. परिस्थितीचा रागरंग बघून चंद्रशेखर राव यांनी ममता बॅनर्जीची मैत्री सोडली व भाजपाबरोबर मैत्री केली. याची “रिर्टन गिफ्ट’ म्हणून भाजपाने तेलगंण विधानसभा विसर्जित होऊ दिली.

राज्यशास्त्राचे अभ्यासक असे मानतात की, सत्तेच्या राजकारणात कोणत्याच प्रकारची पोकळी फार काळ राहू शकत नाही. आज विरोधी पक्षांना नेताच नाही, याचा अर्थ 2019 सालच्या लोकसभा निवडणूका सर्व विरोधी पक्ष एकत्रित लढवणार नाहीत असे नाही. जरी बॅनर्जींनी हे प्रयत्न सोडले असले तरी आता हेच प्रयत्न नव्या जोमाने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू करत आहेत.

नायडू व बॅनर्जी यांच्यात भरपुर फरक आहे. नायडू एक गंभीर प्रवृत्तीचे नेते समजले जातात तर ममता बॅनर्जींच्या राजकारणाचा सर्व भर भावनिक आवाहनावर असतो. चंद्राबाबू गेली अनेक वर्षे आंध्र प्रदेशचे राजकारण समर्थपणे करत आहेत. त्यांनी एकेकाळी आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद शहराला देशाची आयटी राजधानी केले होते. त्यांच्या डोळयांसमोर विकासाच्या सुस्पष्ट कल्पना आहेत. थोडक्‍यात, नायडू विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सर्वार्थाने लायक नेते आहेत.

नायडूंना दिल्लीचे राजकारण नवीन नाही. वर्ष 1998 ते 1999 दरम्यान सत्तेत असलेल्या भाजपाप्रणीत “राष्ट्रीय लोकशाही आघाडी’त त्यांचा पक्ष दोन नंबरचा मोठा पक्ष होता. त्या आधीची महत्वाची घटना म्हणजे जेव्हा 1996 साली संयुक्‍त आघाडी सत्तेत आली तेव्हा पंतप्रधानपदी कोणी विराजमान व्हायचे असा प्रश्‍न उपस्थित झाला. तेव्हा व्ही. पी. सिंग यांनी नकार दिला तर ज्योती बासू यांना त्यांच्या पक्षाने ही जबाबदारी स्वीकारू दिली नाही. नंतर हे पद चंद्राबाबूंना देण्यात आले; पण त्यांनी नम्रपूर्वक नकार दिला. परिणामी देवेगौडा व नंतर डॉ. इंदरकुमार गुजराल पंतप्रधान झाले होते. आता पुन्हा चंद्राबाबू राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले आहेत.

ऐशीच्या दशकात भारतीय संघराज्यातील अनेक राज्यांवर कॉंग्रेसची मजबुत पकड होती. असेच एक राज्य म्हणजे आंध्र प्रदेश. तेलूगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय नट एन. टी. रामाराव यांनी “तेलूगू अस्मिता’ हा मुद्दा घेऊन 29 मार्च 1982 रोजी “तेलूगू देसम पार्टी’ स्थापन केली व वर्ष 1985 च्या विधानसभा निवडणुका जिंकून मुख्यमंत्रीपद मिळवले. चंद्राबाबू नायडू त्यांचे जावई.

पुढे नायडूंनी सासऱ्याविरुद्ध बंड केले व पक्ष ताब्यात घेतला. रामाराव यांचे 1996 साली निधन झाले. त्यानंतर नायडू पक्षाचे सर्वेसर्वा झाले आहेत. आता नायडू भाजपाला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वास्तविक भारतातल्या जवळजवळ सर्व प्रादेशिक पक्षांचा उगम आणि विकास हा कॉंग्रेसच्या विरोधात केलेले राजकारणावर अवलंबून आहे. तसेच ते तेलूगू देसम पक्षाचे होते. आता मात्र नायडूंनी चक्‍क कॉंग्रेसशी तेलंगण विधानसभा निवडणूकीसाठी हातमिळवणी केली आहे.

नायडू आता “आंध्र प्रदेशला खास दर्जा न देणाऱ्या भाजपाला पराभूत करा’ असा प्रचार करत आहेत. ते जेव्हा देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत होते, तेव्हा त्यांचे समकालीन नेते म्हणजे मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, व्ही. पी. सिंग, अटलबिहारी वाजपेयी होते.

आज उत्तर प्रदेशात अखिलेश यादव, बिहारमध्ये तेजस्वी यादव, कर्नाटकात कुुमारस्वामी, तामिळनाडूत स्टालिन असे नेते प्रभावशाली आहेत. या नव्या पिढीच्या नेत्यांशी नायडू कसा संवाद साधू शकतील, हा खरा प्रश्‍न आहे. वर्ष 1996 मध्ये मुलायमसिंहांच्या आग्रहामुळे मायावतींना “संयुक्‍त आघाडी’तून बाहेर ठेवण्यात आले होते. आज तशी परिस्थिती उरलेली नाही. आता तर अखिलेश व मायावती यांनी युती केलेली आहे. थोडक्‍यात म्हणजे 1996 ची राजकीय परिस्थिती आज नाही आहे. लोकशाहीत अंतिमतः आकडयांना महत्व असते. आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण निर्माण होईपर्यंत आंध्रातून तब्बल 42 खासदार लोकसभेत जात असत. आता तेथून 25 खासदार निवडून जातात. म्हणजेच आता नायडूंची राजकीय शक्‍तीही कमी झालेली आहे.

नायडूंना विरोधी पक्षांच्या राजकारणात कॉंग्रेसच्या महत्त्वाचा अंदाज आहे. म्हणूनच ते कॉंग्रेसच्या मदतीने विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहेत. सर्व विरोधी पक्ष एकाच झेंड्याखाली येतील, असे आज तरी वाटत नाही. मात्र प्रत्येक राज्यात भाजपासमारे एकच उमेदवार देण्याचा आटोकाट प्रयत्न करतील, याबद्दल खात्री वाटते. येथे आज कॉंग्रेसची मानसिकता अशी आहे की, येनकेन प्रकारे भाजपाला सत्तेतून खाली खेचायचेच. मग कर्नाटकप्रमाणे स्वत:कडे जास्त जागा असूनही मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावे लागले तरी चालेल.

तरीही कॉंग्रेसवर विश्‍वास टाकावा की नाही, याबद्दल अनेक प्रादेशिक पक्षांच्या मनांत चलबिचल आहे. राजीव गांधींच्या नेतृत्वाखालच्या कॉंग्रेसने वर्ष 1991 मध्ये चंद्रशेखर यांना बाहेरून पाठिंबा दिला व पंतप्रधानपदी बसवले. पण जेव्हा कॉंग्रेसचा स्वार्थ पूर्ण झाला, तेव्हा कॉंग्रेसने ताडकन चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढून घेतला व सरकार पाडले. आता पुन्हा कॉंग्रेस अशीच चाल खेळेल, असा जर प्रादेशिक पक्षांच्या मनांत संशय असेल तर त्यांना दोष देता येणार नाही.

नेमके येथेच चंद्राबाबू नायडूंच्या नेतृत्वाचे महत्व लक्षात येते. ते जर विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करत असतील तर त्या प्रयत्नांकडे आशेने बघता येईल. त्यांच्या नेतृत्वावर अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचा विश्‍वास आहे. ते जर कॉंग्रेसच्या मदतीने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये तिरंगी सामने टाळण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्‍यता जास्त आहे.

वर्ष 2019 च्या निवडणुकांत विरोधी पक्षांनी भाजपाला पराभूत केले तर पंतप्रधानपदी कोणी बसायचे? हा प्रश्‍न समोर आला की विरोधी पक्षांच्या एकजुटीचे बारा वाजायला लागतात. यावर ‘ज्या पक्षाचे जास्त खासदार त्या पक्षाकडे पंतप्रधानपद’ हा नेहमीचा फॉर्म्युला येथे लागू होत नाही. याचे कारण या फॉर्म्युल्यात कॉंग्रेसचे जास्त खासदार असतील हे अगदी उघड आहे. यावर दुसरा उपाय म्हणजे ज्या विरोधी पक्षाकडे नंबर दोनची खासदारसंख्या असेल त्याला पंतप्रधानपद व उपपंतप्रधानपद कॉंग्रेसला असा नवीन फॉर्म्युला काढता येईल.

आज याबद्दल काहीही ठोसपणे सांगता येणे शक्‍य नाही. परिस्थिती दररोज एवढया झपाटयाने बदलत असते की काहीही भाकितं करणे धोक्‍याचे आहे. मात्र नायडू कॉंग्रेसच्या मदतीने जे प्रयत्न करत आहेत त्यांना यश मिळण्याच्या शक्‍यता दाट आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)