चांदणी चौकात मराठा आंदोलनाला हिंसक वळण

सायंकाळी वातावरण निवळले

पुणे – मराठा क्रांती मोर्चाने 9 ऑगस्ट क्रांतीदिनी “महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आणि सकल मराठा समाजाने चांदणी चौकातील महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. सकाळपासून शांततेमध्ये सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. त्यावेळी जमावाकडून दगडफेक करण्यात आले. त्यामध्ये काही पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जमावाला फांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. त्यानंतर दुपारी चारनंतर आंदोलन शांत झाले आणि बंदोबस्तात महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

-Ads-

पुणे शहरातील प्रमुख प्रवेशद्वारे असलेल्या चांदणी चौकात आंदोलकांनी सकाळपासून ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली. त्यामुळे पुणे-सातारा आणि पुणे-मुंबई महामार्ग बंद होता. मुळशी, बावधन आणि कोथरूडकडून येणाऱ्या रस्त्यांवरही आंदोलकांनी ठिय्या मांडला. पौड रस्त्यावरील भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर पोलीस स्टेशन, वनाज कंपनी, आनंदनगर, मोरे विद्यालय आणि पौड फाटा येथे आंदोलकांनी वाहने किंवा बॅरिगेट्‌स लावत रास्तारोको केला होता. पौड रस्त्यावरील सर्व दुकाने, हॉटेल, मॉल बंद होते. नागरिकांनीही घराबाहेर पडायचे टाळले आणि ठिकठिकाणी रस्ते चक्काजाम केल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळाला.

चांदणी चौकात सकाळपासून शांततेमध्ये ठिय्या आंदोलन सुरू होते. काही आंदोलकांनी टाळ, मृदुंग घेऊन महामार्गावर भजन म्हणत बसले. “जय भवानी…जय शिवाजी, “कोण म्हणते देणार नाही…घेतल्याशिवाय राहणार नाही’ यासह सरकारविरोधात घोषणाबाजी करत महामार्ग बंद ठेवला. दुपारपर्यंत हे आंदोलन शांततेमध्ये सुरू होते. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना महामार्ग खुला करून देण्याबाबत आवाहन केले. त्यानंतर काही आंदोलक निघून गेले. मात्र, भुसारी कॉलनीतील लोहिया आयटी जैनपार्क याठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्यात आला. त्यानंतर आंदोलकाला हिंसक वळण मिळत गेले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केल्यामुळे चांदणी चौकातील आंदोलनाची परिस्थिती चिघळली. जमावाकडून दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये काही पोलीस जखमी झाले. मात्र, परिस्थिती आणखी चिघळू नये, जमाव पसरावा, आंदोलक शांत व्हावे यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर जमाव पांगला आणि काहीवेळाने चांदणी चौक आणि पौड रस्त्यावरील आंदोलन हळूहळू शांत झाले. दुपारी चारनंतर पोलिस बंदोबस्तात पुणे-सातारा-मुंबई महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)