मधल्या फळीची चिंता दुर करण्याचे आव्हान

भारतीय संघाने आत्ताच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा स्वप्नवत दौरा पुर्ण केला. प्रथमच भारताने या दौऱ्यात कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे विश्‍वचषकापुर्वी हा दौरा संघाचे मनोबल वाढवणारा ठरणारा असला तरी मोक्‍याच्या क्षणी मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश अद्यापही संघासाठी चिंतेचा विषय आहे.

भारतीय संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकली ज्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपली उपयुक्तता सिद्ध करत लागोपाठ तीन अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. मात्र, न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत अखेरच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाजांनी खराब कामगिरी केल्याने संघाच्या चिंतेत भर पडली होती. त्यातच त्यानंतरच्या टी-20 मालिकेतही संघाच्या मधल्या फळीने कच खाल्याने भारतीय संघाला मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिका पराभवामुळे भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीत नसलेले सातत्य प्रकर्षाने सर्वांना जाणवले आहे.

त्यातच विश्‍वचषक स्पर्धा काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्यापुर्वी भारताकडे आता केवळ ऑस्ट्रेलियाच्या संघाविरोधात मायदेशात होणारी एकमेव मालिका शिल्लक आहे. या मालिकेतच भारतीय संघाला मधल्या फळीसाठी उपयुक्त फलंदाज शोधावा लागणार आहे. दरम्यान संघातील फलंदाजाच्या क्रमवारी वरुनही बरीच चर्चा रंगताना दिसून येते आहे. ज्यात कर्णधार विराट कोहलीच्या मते चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायुडूहा उत्तम फलंदाज आहे. तर, उपकर्णधार रोहित शर्माच्या मानण्यानुसार महेंद्रसिंग धोनी हा या क्रमांकासाठी उपयुक्त फलंदाज आहे. त्यामुळे जरी मधल्या फळीतील फलंदाज शोधले तरी त्यांना कोणत्या क्रमांकावर फलंदाजीस उतरवायचे हे मुख्य लक्ष्य संघव्यवस्थापनावर असणार आहे.
कोणताही सामना जिंकायचा असल्यास सलामीवीरांसोबतच मधल्या फळीतील फलंदाजांवर मोठी जबाबदारी असते.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने त्या दृष्टीने अनेक प्रयोग केलेही आहेत. ज्यात विजय शंकर, अंबाती रायुडू, शुभमन गिल, ऋषभ पंत, केदार जाधव यांना मधल्या फळीत फलंदाजी करण्याची संधी दिली होती. मात्र, यातील केवळ विजय शंकर, अंबाती रायुडू आणि केदार जाधव यांनी चांगली कामगिरी केली. मात्र, तेही मोक्‍याच्या क्षणी बेजबाबदार खेळी करुन बाद झाले आणि त्याचा फटका संघाला बसला. त्यामुळे जर भारतीय संघाला विश्‍वचषक जिंकायचा असेल तर मधल्या फळीचे कोडे संघ व्यवस्थापनाला सोडवावे लागणार आहे.

– आनंद गावरस्कर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)