बालेकिल्ला परत मिळवण्याचे काँग्रेससमोर आव्हान

लातूर लोकसभा

विदुला देशपांडे

लातूर म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जिल्हा. कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच हा मतदारसंघ ओळखला जात असे, पण आता हे चित्र बदलले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, म्हणजे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपचा बोलबोला आहे आणि या लोकसभा निवडणुकीतही भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असा दावा केला जात आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुधाकर भालेराव शृंगारे, कॉंग्रेसचे मच्छिंद्र कामत, वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर आणि बसपचे सिद्धार्थ कांबळे निवडणूक रिंगणात आहेत. यावेळी भाजपचे इथले विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांनाच उमेदवारी मिळेल अशी अनेकांची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. गायकवाड यांचे लातूरचे स्थानिक नेते संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याशी कधी पटले नाही आणि स्थानिक पातळीवर त्यांचा संपर्कही कमी होता. यावेळी उमेदवारीसाठी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुधाकर शृंगारे यांची जोरदार शिफारस केली आणि त्यांना उमेदवारी मिळाली आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यापासून लातूर लोकसभा मतदारसंघात विकासाची अनेक कामे वेगाने होत आहेत. पूर्वी लातूर पाणी टंचाईसाठी प्रसिद्ध होते.

लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करायची वेळ आली होती, पण आता गेल्या पाच वर्षांत जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून या भागातील पाणीटंचाई कमी झाली आहे. रस्त्यांचे जाळे वेगाने विस्तारत आहे. लातूरचे विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते. केंद्रातही ते मंत्री होते. पण तरीही लातूरमध्ये कोणताही मोठा प्रकल्प इतक्‍या वर्षांत आला नव्हता. या सरकारने रेल्वे बोगी कारखान्याची घोषणा केली आणि त्यावर वेगाने कामही सुरू केले. आता या वर्षी डिसेंबरपर्यंत तेथे उत्पादनाचे कामही सुरू होईल.

भाजपने लातूरला विशेष महत्त्व दिले आहे. 2014 मध्ये भाजपचे सुनील गायकवाड निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली. मग नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका सगळीकडे भाजपने यश मिळवले. कॉंग्रेसचा प्रभाव चांगलाच कमी करण्यात भाजपला यश आले.
शृंगारे हे लोकप्रिय उमेदवार आहेत. लोकांच्या संपर्कात असलेले उमेदवार आहेत. सर्व प्रकारच्या सामाजिक समारंभांत त्यांचा सहभाग असतो. सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.

भाजपचे युवा नेता अरविंद पाटील निलंगेकर हेही अगदी तळागाळातील कार्यकर्ते आणि लोकांपर्यंत पोहोचले आहेत. शृंगारेही गेल्या दोन तीन वर्षांपासून सातत्याने काम करत आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि सर्वांचे सहकार्य घेऊन पुढे जाण्याची वृत्ती आहे. शिवाय भाजपने या मतदारसंघाला दिलेल्या महत्त्वामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांचाही आत्मविश्‍वास बळावलेला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची नुकतीच लातूरमध्ये प्रचारसभा झाली होती.
कॉंग्रेसच्या बाजूचा विचार करायचा तर विलासरावांनंतर येथे एकमुखी नतृत्व नाही. शिवाय मच्छिंद्र कामत हे राष्ट्रवादीतून गेल्याच आठवड्यात कॉंग्रेसमध्ये प्रवेश करते झाले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये त्यांच्याविषयी कुणाला ममत्व नाही. विलासराव देशमुख यांचा लातूरमध्ये दबदबा होता. त्यांच्यानंतर ही परंपरा त्यांचे पुत्र अमित देशमुख चालवत आहेत, पण त्यांचा स्थानिक लोकांशी आता संपर्क नाही.

आश्‍वासन न पाळणारा नेता अशी त्यांची प्रतिमा बनली आहे. ते मुंबईत असल्यामुळे स्थानिक लोकांशी त्यांचा संपर्कच तुटला आहे. त्यामुळे मच्छिंद्र कामत यांचा प्रचार ते कसा करणार हा प्रश्‍नच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लातूरमध्ये कॉंग्रेसची उमेदवारी कुणाला द्यायची हा प्रश्‍न होता, पण निवडणुका जाहीर झाल्यावर या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तब्बल 57 इच्छुकांनी उमेदवारी मिळावी म्हणून पक्ष श्रेष्टींना साकडे घातले होते, पण त्या सगळ्यांना डावलून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा कॉंग्रेसच्या गोटात कोणताही जल्लोष झाला नाही की उत्साह दर्शवला गेला नाही. यावरून मच्छिंद्र कामत यांच्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना मतदारांना आली आहे.
अमित देशमुख मुंबईला असतात.

साखर कारखान्यात त्यांचे वर्चस्व आहे. यंदा एफआरपी द्यावा लागू नये म्हणून लातूरच्या साखर कारखान्याने बाहेरून उस मागवला त्यामुळे लातूर भागातील शेतकरी नाराज आहेत. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतही देशमुखांचे वर्चस्व आहे. पण ही बॅंक केवळ साखर कारखान्यासाठीच आहे का असा प्रश्‍न पडावा असा या बॅंकेचा कारभार आहे. अमित देशमुख त्यांचे बंधू धीरज देशमुख यांच्यासाठी जिल्ह्यात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्याला अजून बराच वेळ द्यावा लागेल. पण भाजपातही गटबाजी आहे. यावर पक्षनेतृत्व कसे मात करते आणि सगळ्या गटांना कसे एकत्र आणते यावर भाजपचे यश अवलंबून आहे हेही विसरून चालणार नाही. कॉंग्रेसला या अंतर्गत गटबाजीचा फायदा उठवता येतो की नाही यावरही बरेच काही अवलंबून आहे. आपला गेलेला गड परत मिळवायचा तर कॉंग्रेसला कठोर मेहनत करायची गरज आहे. लातूर एक्‍स्प्रेसऐवजी नवी मुंबईसाठी रेल्वे सुरू केली जाईल असे आश्‍वासन दिले होते. पण त्याची पूर्तता झाली नाही.

उजनीचे पाणी लातूरला आणणार अशी घोषणा केली होती, पण ही नुसती घोषणाच राहिली असे आरोप कॉंग्रेसकडून होत आहेत. पण भाजपचे सुनील गायकवाड यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. मेट्रो बोगी तयार करण्याचा कारखाना सुरू केला, 160 कोटी रुपयांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्ण होत आले आहे. पासपोर्ट कार्यालय, विभागीय पोस्ट कार्यालय, नीट परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले, मालगाडी व पॅसेंजर अशा 21 नव्या रेल्वेगाड्या सुरू केल्या. जलसंधारणात लातूरचा देशात पहिला क्रमांक आला. केंद्र सरकारच्या विविध योजना यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आल्या. शिवाय सुनील गायकवाड यांची खासदार म्हणून कामगिरीही उत्तम झाली आहे. या सगळ्याचा फायदा भाजपला होईल, शिवाय शिवसेनेची
मदतही मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)