ममता बॅनर्जी यांना आव्हान
कन्निंग- जय श्रीरामचा मंत्र जपल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी आपल्याला अटक करून दाखवावी असे आव्हान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ममतांना दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की बंगाल मध्ये सभा घेण्यापासून त्या मला रोखू शकतात पण भाजपला विजयी होण्यापासून मात्र त्या रोखू शकत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगाल मधील जॉयनगर लोकसभा मतदार संघातील एका प्रचार सभेत ते आज बोलत होते. ते म्हणाले की कोणी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या की ममतां दिदिंना राग येतो. मी उद्या कोलकात्यात असणार आहे. तेथे मी जय श्रीराम घोषणा देणार आहे तुमच्यात हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा असे आव्हान त्यांनी दिले. जाधवपुर लोकसभा मतदार संघातील सभेसाठी आपण तिकडे प्रचाराला जात असताना आपल्या हेलिकॉप्टला तेथे उतरण्यास अनुमती नाकारण्यात आली.
मी सभेला उपस्थित राहु नये असा प्रयत्न त्यांनी केला. तुम्ही मला प्रचाराला येण्यापासून रोखू शकता पण भाजपला विजयापासून रोखू शकत नाही असे ते म्हणाले. शहा यांच्या हेलिकॉप्टरला अनुमती नाकारण्यात आल्याने शहा यांची जाधवपुर मतदार संघातील सभा सोमवारी होऊ शकली नाही. यावेळी बोलताना त्यांनी देशात बेकायदेशीरपणे घुसलेल्या बांगलाघुसखोरांवरही त्यांनी रोष व्यक्त केला. केंद्रात आपला पक्ष पुन्हा सत्तेत आल्यानंतर या घुसखोरांना देशाबाहेर घालवून दिले जाईल असे ते म्हणाले. हे लोक आपल्या देशाची कमाई फुकट खात आहेत असेही ते म्हणाले. ममतांनी सोनार बांगला हा कंगाल बांगला केला अशी टीकाहीं त्यांनी केली.