चुरशीच्या लढती : 1984, लातूर लोकसभा मतदारसंघ पद्मसिंह पाटील वि. शिवराज पाटील

1984 मध्ये शरद पवारांचा समाजवादी कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रात कॉंग्रेसपुढे मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून उभा ठाकला होता. यशवंतराव चव्हाण कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना मानणारे बहुतांश कार्यकर्ते पवारांना सोडून कॉंग्रेसमध्ये गेले होते. त्यामुळे पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसची ताकद कमीच झाली होती. तरीही पवारांनी जिद्द सोडली नव्हती. 1984 मध्ये आपल्या पक्षाची ताकद आजमावण्यासाठी पवारांनी लोकसभा निवडणुकीतही जातीने लक्ष घातले होते. स्वतः पवार बारामतीतून उभे होते. त्यानंतर तीन-चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे पवारांचे खरे लक्ष होते. लोकसभा निवडणुकीद्वारे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सज्ज करायचे अशी पवारांची रणनीती होती. यानुसार पवारांनी अनेक मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते.

डॉ. पद्मसिंह पाटील यांना यासाठीच त्यांनी लातूर मतदारसंघात शिवराज पाटील यांच्याविरोधात उभे केले होते. पद्मसिंह पाटील हे लातूर शेजारच्या उस्मानाबादचे. ते त्यावेळी समाजवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. पद्मसिंह पाटील यांनी शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या विरोधात तरुण कार्यकर्त्यांच्या मदतीने जबरदस्त प्रचार यंत्रणा उभी केली होती. मराठवाड्यातील ग्रामीण भागात त्यावेळी तरुण मतदारांवर शरद पवारांची मोहिनी होती. याचा फायदा घेत पद्मसिंह पाटलांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली होती. लातूर मतदारसंघात मराठा विरुद्ध लिंगायत हा वाद निवडणुकांवेळी नेहमीच तयार केला जातो. शिवराज पाटील यांची प्रतिमा विद्वान आणि चांगल्या प्रतिमेचा राजकारणी अशी होती. लातूरमध्ये खरे तर समाजवादी कॉंग्रेसचे फारसे काम नव्हते. तरीही पद्मसिंह पाटलांच्या आक्रमक प्रचारतंत्रामुळे शिवराज पाटील पराभूत होणार असे वातावरण संपूर्ण मतदारसंघात तयार झाले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)