गंगापुरी ते शेलारवाडी रस्त्याची झालीय चाळण

अपघाताच्या प्रमाणात वाढ; रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

वाई – वाई तालुक्‍यातील काही गावांच्या रस्त्याची एका पावसातच चाळण झाली आहे. पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे कि खड्ड्यातून रस्ता अशी दयनीय अवस्था झाली असून कामाचा दर्जा तपासून पाहण्याची गरज आहे. गंगापुरी ते शेलारवाडी हा रस्ता अतिशय महत्वाचा असून या रस्त्यावर वाईची औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे कंपनीत कामाला जाणाऱ्या कामगारांना जीव मुठीत घेवून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. अनेक प्रकारच्या कंपन्या या भागात असल्याने या रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणात असते. रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. किती अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार असा प्रश्‍न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे.

वाई तालुक्‍याचे तारणहार म्हणून समजले जाणारे गरवारे कंपनीचे युनिट या रस्त्यालगतच आहे. त्यामुळे या कंपनीसह सर्वच कंपनी कामगार याच रस्त्याचा वापर कंपनीत जाण्यासाठी करतात. त्यामुळे गंगापुरी ते शेलारवाडी रस्त्याबाबत प्रशासनाने गांभीर्याने घेवून त्वरित रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावावा अन्यथा कंपनी कामगारासह सर्वच कंपनी मालक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तशा आशयाचे निवेदनही औद्योगिक वसाहतीतील एम.आय.डी.सी.तील कार्यालयात कामगारांनी दिले आहे. वाई तालुका शिवसेनेनेही हा प्रश्‍न हाती घेतला असून लवकरच जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला तसे निवेदन देण्यात येणार आहे. लवकरात लवकर हा प्रश्‍न मार्गी लावून रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, मालक यांचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)