महाळुंगे इंगळे – चाकण नगरपरिषदेची हद्दवाढ करून औद्योगिक परिसरातील 16 गावांचा समावेश करण्यासाठी चाकण उद्योग पंढरीतील महाळुंगे इंगळे (ता. खेड) या प्रमुख गावाला समावेशासाठी नगरपरिषदेने पाठविलेल्या लेखी पत्राला ग्रामस्थांनी सडेतोड उत्तर दिले असून, चाकण नगरपरिषदेत महाळुंगे इंगळे या गावाचा समावेश करण्यास ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे.
चाकण नगरपरिषेदेने महाळुंगे इंगळे येथील ग्रामपंचायतीस समावेश होण्याबाबत एक पत्र पाठवले होते. त्यास गावातील लोकप्रतिनिधी म्हणून गावच्या वतीने आमचा ठाम विरोध असल्याचे महाळुंगे इंगळे गावचे उपसरपंच योगेश महाळुंगकर यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आमदार, खासदार आदींकडे पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतीने चाकण नगर परिषदेमध्ये महाळुंगे इंगळे गावाचा समावेश न होणे बाबत हरकती नोंदवलेल्या आहेत.
चाकण परिसराचा दिवसागणिक विस्तार होत असून, मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण वाढत आहे. यासाठी पुरेशा सुविधा मिळाव्यात, म्हणून हद्दवाढ गरजेची आहे.
महाळुंगे इंगळे, आंबेठाण, बिरदवडी, वाकी खुर्द, गोनवडी, रोहकल, पिंपरी खुर्द, नाणेकरवाडी, खराबवाडी, निघोजे, खालुंब्रे, मोई, चिंबळी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी आदि प्रमुख गावांचा समावेश चाकण नगरपरिषदेत करण्यासाठी ग्रामसभा व ग्रामस्थांची हरकत मागवली होती. त्यास महाळुंगे गावच्या ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 15) बैठक घेत प्रखर विरोध दर्शविला आहे.
चाकण नगरपरिषदेत ज्या ग्रामपंचातींची हद्दवाढ व्हावी, अशी मागणी असलेल्या स्थानिक नागरिकांचा या हद्दवाढीला समाविष्ट गावांचा प्रखर विरोध असून, सर्वच सोळा गावच्या सरपंचांनी आम्हाला नगरपरिषदेत जायचे नाही, असा ठाम निर्धार केला आहे. नगरपरिषदेला फक्त आमच्या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर डोळा असल्याचे या 16 गावांचे म्हणणे आहे.
महाळुंगे इंगळे गावचा विकास नियोजनबद्ध रित्या सुरू आहे.नगरपरिषदेने पहिल्यांदा शहरातील विकास कामे करावीत, मग हद्दवाढीची मागणी करावी. आजपर्यंत नगरपरिषदेने एकही ठोस काम केलेले दिसत नाही, ते समाविष्ट गावांचा काय विकास करतील? त्यामुळे आमचा या हद्दवाढीला ठाम विरोध आहे.
– योगेश महाळुंगकर, उपसरपंच, महाळुंगे इंगळे
महाळुंगे इंगळे गावचा समावेश नगरपरिषदेत केल्यास गावातील पायाभूत सुविधा कोलमडू शकतात. स्थानिक पातळीवर हवा असणारा विकास खोळंबून नव्याने करण्यात येणाऱ्या कामांना खीळ बसू शकते.
– संदेश जाधव, युवा कार्यकर्ते, महाळुंगे इंगळे