चाफळ विभागात चेन स्नॅचरांचा धुमाकूळ

गंठण चोरीची दुसरी घटना; पोलिसांची चुप्पी

चाफळ – चाफळ विभागात गेल्या महिनाभरापासून चेन स्नॅचरांचा अक्षरश: धुमाकूळ सुरु आहे. डेरवण पाठोपाठ विरेवाडी या डोंगराच्या कुशितील गावात कपडे धुण्यासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून घेत महिलेला झुडपात ढकलून देण्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. किसाबाई तुकाराम जाधव असे संबंधित महिलेचे नाव आहे.

दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांकडे पोलीस यंत्रणेने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे. केवळ अर्थपूर्ण तडजोडीत मग्न असलेल्या चाफळ पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, चाफळ विभागातील विरेवाडी या डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावातील किसाबाई जाधव ही महिला गुरुवारी घरकाम आवरुन कपडे धुण्यासाठी गावालगत असणाऱ्या पाणवठ्याच्या ठिकाणी जात होती. यावेळी रस्त्यावरच दोन अनोळखी इसम दुचाकी लावून थांबलेले होते.

ही महिला जात असताना त्या इसमांनी याठिकाणी पाण्याचे तळे कुठे आहे? अशी विचारणा केली. मात्र या महिलेने त्याला प्रतिसाद न देता त्या पुढे निघून गेल्या. यावेळी मागून दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी जबरदस्तीने किसाबाई यांच्या गळ्यातील सुमारे 40 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण हिसकावले. यावेळी महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या इसमांनी सदर महिलेस झुडपात ढकलून गंठण घेवून तारळेच्या दिशेने पोबारा केला. यावेळी महिलेने आरडाओरड करताच जवळपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

काहींनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते पसार झाले. ते दुचाकीवर असल्याने लगेच त्यांनी पोबारा केला. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी डेरवण येथील महिलेच्या बाबतीत घडला होता. यावेळीही पोलिसांनी या घटनेकडे गांभिर्याने पाहिलेले नव्हते. यामुळे त्याच घटनेची पुन्हा विरेवाडीत पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे. घटनेची तक्रार ज्ञानदेव जाधव यांनी चाफळ पोलिसात दिली आहे.

चाफळ विभागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून म्हणावे असे प्रयत्न होताना दिसत नाहीत. चेन स्नॅचर सारखा प्रकार पहिल्यांदाच या विभागात पहावयास मिळू लागला आहे. यासाठी पोलीसांनी विभागात येणाऱ्या नवीन व्यक्तीची चौकशी करणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित गावचे जबाबदार ग्रामस्थ, पोलीस पाटील यांच्यामार्फत अशा गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे.
डी. जी. यादव माजी उपसभापती

चोरीच्या प्रकारामुळे महिला असुरक्षित
चाफळ विभागात दिवसा ढवळ्या घडत असलेल्या चोरीच्या प्रकारामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे संबंधित चोरट्यांचा शोध घेण्यासाठी चाफळचे पोलीस प्रयत्न करणार की पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच भूमिका बजावणार? असाही प्रश्‍न विभागातील जनतेतून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)