कृषी यांत्रिकिरणातून भात लागवडीची सेंच्युरी

कामशेत – राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत यंदा मावळ तालुक्‍यात सुमारे 100 एकर क्षेत्रावर यंत्राद्वारे भात लागवडीची प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहेत. यंत्राद्वारे होणाऱ्या लागवडीसाठी शेतकऱ्यास कृषी विभागाकडून एकरी चार हजार रुपये एवढे अनुदान देखील देण्यात येत आहे. यांत्रिकी भात लागवडीसाठी रोपवाटिका तयार आहेत. यावर्षी तालुक्‍यातील बधलवाडी, बेलज, कशाळ, वडेश्‍वर, माऊ, वारू, येळसे, सडवली, नाणोलीतर्फे चाकण, नवलाख उंब्रे, इंगळून, गहुंजे, देवले, नागाथली, वहानगाव, कल्हाट आदी गावांमध्ये यंत्राद्वारे भात लागवडीचे कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

आधुनिक यांत्रिकीकरणाची भात लागवड ही कशाळ व वारू या गावातून झाली आहे. यांत्रिकीकरणातून भातलागवडीची प्रात्यक्षिके गतवर्षी राबविल्यामुळे यंदा मावळ तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतः भात लागवड यंत्र खरेदी केली आहेत. या यंत्राद्वारेच सध्या भात लागवड जोरात सुरू आहे. “आत्मा’ अंतर्गत एकरी दोन हजार रुपये रोपवाटिका तयार करणे व दोन हजार यंत्राद्वारे लागवड भाडे असे एकूण चार हजार रुपये अनुदान या प्रात्यक्षिकांसाठी देण्यात येते.

दिवसभरात या यंत्राद्वारे अडीच ते तीन एकर क्षेत्रावर भात लागवड होते. तसेच यामुळे दोन ओळी आणि दोन रोपांतील अंतर एकसारखे राहते. त्यामुळे बियाणांमध्ये बचत होऊन उत्पन्न वाढते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली. आत्माचे (पुणे) प्रकल्प संचालक अनिल देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्‍यातील प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे. यंत्राद्वारे भात लागवडीमुळे मजूर, वेळ व पैसे यामध्ये बचत होते. याशिवाय कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत विविध कृषी यंत्र व अवजारे यांना अनुदान असल्यामुळे दिवसेंदिवस यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

“आत्मा’चे मावळ तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, गावपातळीवरील कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक एन. बी. साबळे, कृषी सहायक एस. एस. ताकवले, बी. एस. पवार, ए. के. वरवडे, एस. डी. जाधव आदी परिश्रम घेत आहेत. या यंत्राद्वारे भात लागवड पाहून मावळ तालुक्‍यातील अनेक शेतकरी पुढील वर्षी भात लागवड यंत्र खरेदी करण्याची मनीषा व्यक्‍त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत अधिकाधिक उत्पन्न वाढीचा उद्देश कृषी विभागाने व्यक्‍त
केला आहे.

मावळ तालुक्‍यातील दहा-बारा गावांमध्ये आत्मा योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीची प्रात्याक्षिके आहेत. तालुक्‍यातील शंभर एकर क्षेत्रावर ही प्रात्याक्षिके करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या पाच यंत्रांद्वारे भातलागवड केल्याने मजूर, वेळ, खर्च वाचतो. याशिवाय उत्पादनात वाढ होत आहे. सध्या मावळात लागवडीसाठी पोषक पाऊस सुरू असल्याने अंदाजे 25-30 जुलैपर्यंत भात लागवड सुरू आहे.

– देवेंद्र ढगे, कृषी अधिकारी, मावळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)