नवी दिल्ली – कमी कालावधीत लोकप्रिय झालेले टिक-टॉक या ऍप वर बंदी घालण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थिगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने Google आणि Apple यांना टिक-टॉक हे ऍप काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मद्रास उच्च न्यायालयात टिक-टॉक या ऍपच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मदुराई येथील वरिष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते मुथु कुमार यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देत न्यायमूर्ती एन किरुबाकरन आणि एस एस सुंदर यांनी टिक-टॉक या ऍपमुळे आक्षेपार्ह व्हिडिओचा वापर करणे धोक्यापेक्षा कमी नसल्याचे म्हंटले होते. तसेच हे ऍप वापरणारी लहान मुले लैंगिक अत्याचारांना बळी पडण्याची शक्यता असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. त्यानंतर या निकालावर सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले होते. यावर सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थिगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे.