शिवाजी विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात

मोठी स्वप्ने पाहा; सृजनशील बना: डॉ. भीमराया मेत्री

कोल्हापूर: मोठी स्वप्ने पाहा, सृजनशील बना, सातत्याने आत्मपरीक्षण करा व नवता, सर्वौत्कृष्टतेचा ध्यास धरा, नवतंत्रज्ञान आत्मसात करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय मूल्यसंस्कृती प्राणपणाने जोपासा, अशी यशाची पंचसूत्री तिरुचिरापल्ली येथील आय.आय.एम.चे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्नातकांना आज येथे दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवाजी विद्यापीठाचा ५५वा दीक्षान्त समारंभ विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आज दुपारी झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मेत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती श्री. चे. विद्यासागर राव होते, तर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.

यावेळी भारतीय मूल्यांचे महत्त्व विषद करताना डॉ. मेत्री म्हणाले, विद्यार्थ्यांनी आयुष्यात असो किंवा उद्योग-व्यवसायात नीतीमूल्यांची कधीही तडजोड करू नये. सन २००८च्या जागतिक मंदीच्या कालखंडामध्ये अमेरिका-युरोपातील अनेक कंपन्या धडाधड बंद पडत असतानाच, भारतीय कंपन्यांनी केवळ उत्तम कामगिरीच केली नाही, तर प्रगतीपथावर आगेकूच करीत असतानाच आपल्या कर्मचाऱ्यांना उत्तम वेतनवृद्धीही दिली. जागतिक उद्योगक्षेत्रात त्यावेळी भारतीय मूल्यसंस्कृतीने एका जबरदस्त शस्त्राप्रमाणे आपले प्रभुत्व सिद्ध केले. माझ्या कारकीर्दीत मी चार खंडांतील २५ देशांचा दौरा केला. या दरम्यान आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण मला लाभली, ती म्हणजे तुम्ही नम्र, सहनशील आणि स्नेहभावाने साऱ्या जगाला जोडू शकता.

डॉ. मेत्री पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाचे, देशाचे नाव उज्ज्वल करावयाचे असेल, तर सर्वोत्कृष्ट कामगिरीचा ध्यास धरला पाहिजे. दैनंदिन जीवनात आपल्या हातून होणारे प्रत्येक काम सर्वोत्कृष्टच असले पाहिजे, असे जेव्हा तुम्ही ठरवाल, तेव्हाच हा ध्यास पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करील. जीवन हा केवळ स्वतःचा शोध नव्हे, तर स्वतःला घडविण्याची कार्यशाळा आहे. जीवनात कोणत्याही ध्येयासक्तीला कोणतीही मर्यादा नाही. ही मर्यादा आपणच स्वतःच्या मनात घालून ठेवतो. स्वतःला त्या मर्यादेच्या भावनेतून बाहेर काढा.

ज्याचा कोणी विचार करीत नाही, अशा गोष्टीचा जो विचार करतो, आणि जे इतर कोणी पाहू शकत नाही, अशी गोष्ट साध्य करतो, तो खरा नेता, या स्वामी विवेकानंदांच्या उक्तीचा दाखला देत डॉ. मेत्री म्हणाले, वेगळेपणाचा ध्यास तुमच्यातील नेतृत्वगुणांचा विकास करतो. पुष्कळ पाठीराखे किंवा कार्यकर्ते हे नव्हे, तर तुम्ही किती नेतृत्व निर्माण करता, हे खऱ्या नेत्याचे लक्षण असते. नवता, नवनिर्मिती आणि सृजनशीलता या गुणांच्या बळावरच तुम्ही स्वतःत नेतृत्वगुण विकसित करू शकता. नवनिर्मिती हा तर खालपासून वरपर्यंत आपल्या गुणसूत्रांतच असायला हवी, इतकी महत्त्वाची बाब आहे.

डीजीटल युगात जन्मलेली आपली पिढी ही खरोखरीच भाग्यवान असल्याचे सांगून डॉ. मेत्री म्हणाले, लॅपटॉप, स्मार्टफोन्स, समाजमाध्यमे अशा वैविध्यपूर्ण बाबींनी सजलेल्या डिजीटल युगातील आपण सारे विद्यार्थी ज्ञानयुगाचे वारकरी आहात. सध्या भारत जागतिक स्तरावर गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जगातल्या आघाडीच्या तीन देशांपैकी एक होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. जगातील सर्वाधिक तरुण महासत्ता असलेल्या येथील प्रत्येक युवकाला जागतिक स्तरावर संधींची द्वारे खुली आहेत. साहजिकच तुमच्याकडून देशाला अपेक्षाही तितक्याच मोठ्या आहेत. कदाचित आज अनेकांना माहीतही नाहीत, अशा वेगळ्याच क्षेत्रात आपल्यापैकी काही जण कार्यरत होईल, असे आजचे चित्र आहे. उच्च प्रतीची कौशल्ये, ज्ञान, स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता हे या युगातील कळीचे शब्द आहेत, हे ध्यानी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)