नवी दिल्ली – प्रसिद्ध विधीज्ञ इंदिरा जयसिंह यांच्या कार्यालयासह त्यांचे पती आनंद ग्रोव्हर यांच्या “लॉयर्स कलेक्टिव्ह’ या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयावर सीबीआयकडून आज छापे घालण्यात आले. निजामाबाद येथील निवासस्थान, इंदिरा जयसिंह यांचे कार्यालय, जंगपुरा भागतील संस्थेचे कर्यालय अणि मुंबईतील कार्यालयावर सीबीआयने छापे घातले आणि झाडाझडती केली.सीबीआयची ही कारवाई पहाटे 5 वाजताच सुरू झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संस्थेला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये विदेशी चलनाशी संबंधित कायद्याचा भंग केल्याबद्दल ग्रोव्हर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर ग्रोव्हर यांनी “डिस्टर्ब करू नका.’ अशी सूचना पत्रकारांना केली. सीबीआयकडून झालेल्या आरोपंचे “लॉयर्स कलेक्टिव्ह’ ही स्वयंसेवी संस्थेने तीव्र शब्दात खंडन केले आहे. गृहमंत्रालयाने तक्रार दाखल केल्यानंतर सीबीआयने ग्रोव्हर आणि “लॉयर्स कलेक्टिव्ह’च्या विरोधात “एफसीआरए’ भंगाच्या आरोपाखाली “एफआयआर’ दाखल केली आहे.
“लॉयर्स कलेक्टिव्ह’मध्ये विदेशी देणग्यांच्या कथित अनियमितता आणि विदेशी निधीच्या वापरावरून गृहमंत्रालयाने सीबीआयकडे तक्रार दिली आहे. “लॉयर्स कलेक्टिव्ह’ला 2006-07 ते 2014-15 दरम्यान विदेशातून 32.39 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. या निधीमध्ये मोठी अनियमितता असल्याने विदेशी चलनाशी संबंधित कायद्याचा भंग झाल्याचा आरोप गृहमंत्रालयाने केला आहे.
इंदिरा जयसिंह या माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आहेत. सीबीआयच्या “एफआयआर’मध्ये त्यांचे नाव नाही. मात्र त्यांच्या भूमिकेवर गृहमंत्रालयाच्या तक्रारीमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.