जिल्हा दंडाधिकारी अभय सिंह यांच्या घरावर सीबीआयचा छापा; पैसे मोजण्यासाठी आणावी लागली मशीन

बुलंदशहर – केंद्रीय अन्वेषण विभागाने बुधवारी बुलंदशहरचे जिल्हा दंडाधिकारी अभय सिंह यांच्या घरावर छापा टाकला. सीबीआयने उत्तर प्रदेशातील खाण घोटाळ्याप्रकरणी हा छापा टाकला असून अभय सिंह यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली असून ती मोजण्यासाठी मशिन मागवावी लागली.

मागील सरकारच्या काळात अभय सिंह हे फतेहपूरचे जिल्हा दंडाधिकारी असताना त्यांच्यावर खाण घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती.
10 जुलै रोजी सकाळी सीबीआयचे अधिकारी अभय सिंह यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचले. सीबीआयच्या टिमने जवळपास दोन तास अभय सिंह यांची चौकशी केली. तसेच त्यांच्या घराची झडती घेण्यात आली.

अखिलेश यादव हे मुख्यमंत्री असताना अभय सिंह हे फतेहपूरचे जिल्हाधिकारी होते. सीबीआयने मंगळवारी 19 राज्यांमध्ये 110 ठिकाणी धाडी घातल्या होत्या. तर, याअगोदर 2 जुलै रोजी केलेल्या कारवाईत 12 राज्यांमधील 50 शहरांतील 50 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. या कारवाईत 16 बॅंक घोटाळ्यातील प्रकरणांचा समावेश होता. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, जम्मू, श्रीनगर, जयपूर, गोवा, ओडिसा, आंध्र प्रदेश, मुंबई, लुधियाना, ठाणे, भोपाळ, सूरत, कोलार, वलसाड, पुणे, पलनी, गया, गुरुग्राम, चंदिगडसह अन्य अनेक ठिकाणी सीबीआयने धाडी टाकल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)