शिवाजी मार्केटमध्ये कोंबड्यांची कत्तल बंद

कॅन्टोंन्मेंट बोर्डाने घेतला निर्णय : 10 ऑगस्टपासून अंमलबजावणी

पुणे – लष्कर परिसरातील शिवाजी मार्केट येथील कत्तलखान्यात कोंबड्यांची कत्तल बंद करण्याचा निर्णय कॅन्टोंन्मेंट बोर्डातर्फे घेण्यात आला आहे. 10 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांचा परवाना रद्द करणार असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल नवनीत कुमार यांनी जाहीर केले.

शिवाजी मार्केट येथे दररोज मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची कत्तल करून त्यांची विक्री केली जाते. मात्र, याठिकाणी स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नाही. कत्तलखान्यातून फेकण्यात येणारा कचरा, कोंबड्याची पिसे, मासांचे तुकडे यासारख्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. तसेच हा कचरा सांडपाण्यात मिसळून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात जात असल्याने या प्रकल्पाच्या कामकाजातही अडचणी निर्माण होत होत्या. यामुळेच याठिकाणी कोंबड्यांची कत्तल बंद व्हावी, अशी मागणी सातत्याने नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून केली जात होती. नुकतेच बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल कुमार यांनी लोकप्रतिनिधी आणि बोर्डाचे अधिकारी यांच्यासमवेत या ठिकाणाची पाहणी देखील केली होती.

बोर्डतर्फे बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कत्तलखान्यात प्राण्यांची कत्तल बंद करण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर बोर्डाचे उपाध्यक्ष विवेक यादव, नगरसेविका प्रियंका श्रीगिरी, किरण मंत्री, अतुल गायकवाड यांनी कत्तल बंद करण्याची मागणी लावून धरली. तर नगरसेवक अशोक पवार यांनी अनधिकृत स्टॉल धारकांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल कुमार यांनी कत्तलखान्यात कोंबड्यांची कत्तल बंद करण्याचा निर्णय घेतला असून 10 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिला आहे.

मांसविक्रीला परवानगी
शिवाजी मार्केटमधील कत्तलखान्यात कोंबड्यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी मांसविक्रीवर बंदी नाही. त्यामुळे विक्रेते इतर ठिकाणांहून आणलेला मांस याठिकाणी विकू शकतात. तसेच शिवाजी मार्केट येथील विक्रेत्यांसाठी कोंढवा येथे बोर्डातर्फे कत्तलखान्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे बोर्डातर्फे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)