डिक्‍कीचे लॉक न उघडता रोकड, दागिनेचोरी

चोरटा गजाआड : पैसे बचत खाते आणि मुदत ठेवीत

पुणे –
पार्किंग केलेल्या ऍक्‍टिव्हासारख्या मोपेड दुचाकींच्या डिक्कीत अलगद हात घालून त्यातील पैसे व मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराईतास गुन्हे शाखा युनिट-4च्या पथकाने जेरबंद केले. विशेष म्हणजे, या चोरीतील पैशांचा चोरट्याने दोन बॅंकात फिक्‍स डिपॉझिटमध्ये भरणा केला होता. त्यापैकी एका बॅंकेतून पोलिसांनी 4 लाख रुपये जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दिली आहे.

सुभाष ऊर्फ बाबा लक्ष्मण बनपट्टे (वय-40, रा.वडारवाडी, पुणे) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून दुचाकी, चार लाखांची रोकड आणि लॅपटॉप असा सव्वाचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून शहरात बॅंक, शॉपिंग मॉल-मार्केट अशा ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींच्या डिक्कीतून रोकड, दागिने अशा वस्तू चोरीच्या घटना घडत होत्या. त्याअनुषंगाने युनिट-4चे पथक तपास करत असताना गुन्हेगार बाबा बनपट्टे याने सुमारे तीन आठवड्यांपूर्वी नानापेठ येथील एका इमारतीच्या पार्किंगमधून ऍक्‍टिव्हाच्या डिक्कीतून पैसे चोरलेले आहेत, अशी माहिती पोलीस नाईक रमेश चौधर व नीलेश शिवतरे यांना माहिती मिळाली.

त्यानुसार शोध घेत असता, सीसीटीव्ही फुटेजवरुन बाबा बनपट्टे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मागील दोन ते तीन वर्षांत असे 30 ते 40 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलीस तपासात आतापर्यंत 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. सन 2015 मध्ये बनपट्टे हा गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करत होता. त्याच्यावर याआधी असे 10 गुन्हे दाखल आहेत.

चोरीच्या पैशांचे बॅंकेत मुदतठेव

पोलीस निरीक्षक अंजुम बागवान म्हणाले, “आरोपी चोरीतील काही रक्कम खर्च करुन राहिलेली रक्कम काही दिवस घरात ठेवायचा. यानंतर ती थोडी-थोडी बॅंकेत स्वत:च्या खात्यावर भरत होता. त्याच्या एका बॅंक खात्यातून चार लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्या इतर खात्यांची चौकशी सुरू आहे. आरोपीने या पैशांच्या मुदतठेवी केल्याचे तपासात समोर आले असून माहिती घेतली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)