विज्ञानविश्‍व: खडकांमध्ये कार्बन डायऑक्‍साइड बंदिस्त

डॉ. मेघश्री दळवी

पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डायऑक्‍साइड आणि इतर ग्रीन हाऊस वायूंचे प्रमाण सतत वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंग ही आता केवळ एक भीती राहिली नसून त्याचे चटके आपण भोगत आहोत. आपल्या जीवनशैलीतले सगळे पैलू या ना त्या प्रकारे कार्बन डायऑक्‍साइड उत्सर्जनाशी निगडीत आहेत. त्यामुळे कार्बन उत्सर्जनावर आता सगळीकडे निर्बंध येत आहेत. कारखाने, कार्यालये, वाहने, ऊर्जानिर्मितीत सर्वत्र कार्बन डायऑक्‍साइड कमी करण्यावर भर दिला जात आहे.

याच जोडीने वातावरणात आहे तो कार्बन डायऑक्‍साइड कमी करता येईल का, यावर शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ काम करत आहेत. जेव्हा कार्बन डायऑक्‍साइड उत्सर्जित होतो तेव्हा त्यातला काही महासागरांमध्ये शोषला जातो, काही वातावरणात जातो, तर काही माती आणि खडकांमध्ये साठवला जातो. त्यामुळे वातावरणातील कार्बन महासागर आणि खडक यांच्याकडे वळवता येईल का, या दृष्टीने संशोधक विचार करत आहेत.

सच्छिद्र खडक नैसर्गिकरीत्या वातावरणातील कार्बन खेचून घेऊन तो बंदिस्त करून ठेवतात. ही प्रक्रिया अतिशय संथपणे, हजारो वर्षे चालते. मात्र आपण कृत्रिमरीत्या या प्रक्रियेचा वेग वाढवला, तर वातावरणातील कार्बन कमी होण्याला मदत होईल असे शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.

अलीकडे आइसलॅंडमध्ये अशा प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसून आले आहे. तिथल्या संशोधकांनी सच्छिद्र खडकांमध्ये कार्बन डायऑक्‍साइड दाबाखाली सोडला, तेव्हा त्याचे खनिजामध्ये रूपांतर झालेले दिसले. घन अवस्थेत असल्यामुळे त्यात कार्बन डायऑक्‍साइड कायमस्वरूपी बंदिस्त झाला आहे आणि तो पुन्हा वातावरणात झिरपण्याचा थेट धोका नाही. आइसलॅंडमध्ये गरम पाण्याचे अनेक झरे आहेत, ज्वालामुखी आहेत. या भूगर्भातल्या उष्णतेचा वापर करून तिथे विद्युतनिर्मिती केली जाते.

नैर्ऋत्य आइसलॅंडमध्ये हेन्गिल ज्वालामुखीजवळ सहा टर्बाइन्स वापरून रेकयाविक या राजधानीच्या शहराला उष्णता आणि विद्युतपुरवठा केला जातो. या विद्युतनिर्मिती केंद्रात हे प्रयोग करून पाहण्यात आले. पहिल्यांदा तिथे उत्पन्न होणारा कार्बन डायऑक्‍साइड झऱ्याच्या पाण्यात सोडून हे पाणी दूर नेण्यात आले. ते नंतर तिथल्या बेसाल्ट खडकांवर जोराने फवारण्यात आले. पाण्याचे तुषार खडकांमधल्या छिद्राच्या आत गेले आणि तिथल्या कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोखंडाच्या खनिजांच्या संपर्कात आले. तिथे पाण्यातल्या कार्बन डायऑक्‍साइडमधला कार्बनचे घन खनिजात परिवर्तन झालेले आढळून आले. एरव्ही हजारो वर्षे चालणाऱ्या या प्रक्रियेला केवळ दोन वर्षे पुरेशी झाल्याचे दिसून आले.

या विद्युतनिर्मिती केंद्रात उत्सर्जित होणाऱ्या एकूण कार्बन डायऑक्‍साइडच्या साधारण एकतृतीयांश कार्बन अशा प्रकारे खडकांमध्ये बंदिस्त झाल्याचा या संशोधकांचा दावा आहे. वर्षाला बारा हजार टन कार्बन डायऑक्‍साइड असा दूर करता येईल आणि त्यासाठी दर टनाला 25 डॉलर्स खर्च येईल अशी अपेक्षा आहे. हे यश निश्‍चितच आशादायी आहे. असेच प्रयोग मोठ्या प्रमाणात केले तर वातावरणातला कार्बन थोडा तरी कमी करून ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आटोक्‍यात आणणे शक्‍य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)