चालकाचा ताबा सुटून कार थेट खड्ड्यात

“मेट्रो’चे काम सुरू असताना वनाज कॉर्नर येथील घटना

पुणे – चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट “मेट्रो’च्या पिलरसाठी खोदलेल्या खड्ड्यात घुसली. शनिवारी (दि.27) पहाटे पौड रस्त्यावरील वनाज कॉर्नर येथील चौकात घडलेल्या या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही. परंतू, यात चूक मेट्रोची, की वाहनचालकाची? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याने सुरक्षेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी बॅरिकेट्‌स लावले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद झाले असून वाहतूक कोंडी होत आहे. रात्री 11नंतर पिलरवर ब्लॉक टाकणे सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्ते बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येते. मात्र, त्यावेळी अनेक ठिकाणी बॅरिकेट्‌स नसल्यामुळे किंवा कमकुवत बॅरिकेट्‌स लावल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्याचीच प्रचिती शनिवारी पहाटे पौड रस्त्यावर आली. कोथरूड डेपोकडून परमहंस येथील उताराने एसएनडीटीच्या दिशेने निघालेली कार वनाज कॉर्नर चौकात आल्यावर चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट मेट्रोसाठी खोदण्यात आलेल्या पिलरच्या खड्ड्यात घुसली.

त्यावेळी अपूर्ण अवस्थेत (स्टील लावलेले) असलेल्या पिलरला कार धडकली असून, खड्डा खोल असल्यामुळे पूर्ण कार खाली गेली. त्याबाबत पोलिसांना तत्काळ माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. चालकाला कारमधून काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रात्रीच्यावेळी सुरक्षा महत्त्वाची

रात्रीच्या वेळी वाहनांची वर्दळ नसते. त्यामुळे मेट्रोचे काम गतीने सुरू असते. ठिकठिकाणी रस्ते वळविण्यात येतात. परंतु, सुरूवातीला ज्याप्रमाणे रस्ते दाखवण्यासाठी किंवा सुरक्षेच्या दृष्टीने चौकाचौकात कर्मचारी उभे केले जात होते. त्याप्रमाणे आता ते कर्मचारी दिसत नाहीत. तसेच काही ठिकाणी बॅरिकेट्‌स न लावल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे मेट्रोने खबरदारी घेणे आवश्‍यक असून वाहनचालकानींही सावधानतेने वाहन चालवणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)