बागेतील 20 वर्षे जुने चंदनाचे झाड चोरीस
चोरटे “सीसीटीव्ही’मध्ये कैद : तळेगावात कडोलकर कॉलनीतील प्रकार
चंदन चोरांची टोळी सक्रिय
मावळ तालुक्यात चंदन चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. यापूर्वी नगरसेवक संदीप शेळके यांच्या मंगल कार्यालयाच्या शेजारी असलेली दोन चंदनाची झाडे चोरीला गेली होती. मावळ तालुक्यातील घराशेजारी लावलेली जुनी चंदनाची झाडे चोरीला जाण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वेळी दोन व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चंदन चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होईल, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक सुधाकर काटे यांनी व्यक्त केला आहे.
तळेगाव दाभाडे – दोन अनोळखी व्यक्तींनी घरालगतच्या बागेतील 20 वर्षे वयाच्या चंदनाच्या झाड कापून चोरून नेले. तळेगाव दाभाडे येथील कडोलकर कॉलनी येथे शुक्रवारी (दि. 10) पहाटे एकच्या सुमारास हा प्रकार घडला.या प्रकरणी प्रतीक्षा मकरंद मरकळे (वय 43, रा. नवनाथ प्रसाद कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा मरकळे यांच्या घरालगतच्या बागेत 20 वर्षे वयाचे चंदनाचे झाड होते. हे झाड शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी चंदनाचे झाड (खोड) कापून नेले. चोरीचा सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती आले आहे. उपलब्ध फूटेजवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक (गुन्हे) नारायण पवार तपास करीत आहेत.
निर्ढावलेले चोरटे…पुण्यातील राजभवन परिसर अतिसुरक्षित म्हणून ओळखला जातो. पाच वर्षांपूर्वीही देखील चंदन चोरीच्या घटना घडल्या आहेत. जून 2013 मध्ये राजभवन परिसरातून चंदनाची तीन झाडे चोरीला गेली होती. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एका टोळीला अटक केली होती. पण, पुन्हा या ठिकाणाहून पुन्हा चंदनाची झाडे चोरीला गेल्यामुळे राजभवनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटना घडल्या. त्या दिवशी एकाच प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात असताना चोरी होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.