पुणे – घोरपडी बाजार परिसरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून हटविण्यात आले आहे. तब्बल पन्नास कोटी रुपये किंमत असलेल्या या जमिनीवर अतिक्रमण करून ती हडपण्याचा डाव अतिक्रमण करणाऱ्यांकडून केला जात होता. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांना चाप बसला आहे.
घोरपडी बाजार परिसरात अलेक्झांड्रा रस्त्यावर केंद्र सरकारच्या मालकीची 2.10 एकर रिकामी जागा आहे. “ओल्ड ग्रांट’ तत्त्वावर ही जागा वर्गीकृत करण्यात आली होती.
यासंदर्भात बोर्डाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, कॅन्टोन्मेंटच्या अधिसुचित नागरी परिसराच्या हद्दीबाहेर असलेल्या या जागेवर केंद्राच्या संरक्षण विभागाची मालकी होती. गेल्या अनेक दिवसांपासून ही जागा मोकळी पडून होती. त्यामुळे परिसरातील मुलांकडून ही जागा खेळण्यासाठी वापरली जात होती. “ओल्ड ग्रांट’नुसार ही जागा वापरण्याची मुभा दिलेल्या (होल्डिंग ऑक्युपन्ट राइट्स) व्यक्तीने या जागेभोवती सीमाभिंत, तारेचे कुंपण घालून बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बोर्डाने कॅन्टोन्मेंट कायदा 2006 च्या कलम 248 व कलम 320 अन्वये संबंधितांना नोटीस बजावण्याची कारवाई केली. त्यानंतर बोर्डाने 20 ऑगस्ट रोजी जागेवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याचा ठराव केला. त्यानुसार, बोर्ड प्रशासनाने कारवाई करत संबंधित जागा अतिक्रमण मुक्त केली. त्यानंतर ही जागा पुन्हा संरक्षण मालमत्ता विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती बोर्डाच्या अभियांत्रिकी विभागातर्फे देण्यात आली.